Tarun Bharat

मालवणात महावितरणची इमारत धोकादायक

अधिकारी, कर्मचाऱयांच्या जीवितास धोका : पत्र्यांवर शाकारलेले प्लास्टिक कापड गेले वाऱयाने उडून :निधीअभावी नव्या इमारतीचे काम रेंगाळले

वार्ताहर / मालवण:

शहरातील देऊळवाडा येथील महावितरणची इमारत अत्यंत धोकादायक बनली असून यात काम करणाऱया अधिकारी, कर्मचारी अशा एकूण सोळाजणांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. इमारतीवरील पत्र्यांवर पावसापासून संरक्षणासाठी प्लास्टिक कापड शाकारण्यात आले होते. मात्र, तेही उडून गेल्याने आत पावसाचे पाणी पडत आहे. या इमारती शेजारीच बांधलेल्या नवीन इमारतीचे काम निधीअभावी रखडले आहे.

देऊळवाडा येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय आहे. ही इमारत सुमारे सत्तरहून अधिक वर्षांची असून ती सद्यस्थितीत धोकादायक बनली आहे. या इमारतीवर पत्रे असून ते ठिकठिकाणी फुटले आहेत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात संपूर्ण इमारतीवर प्लास्टिकचे कापड टाकून त्यावर दगड व लाकडी ओंडके ठेवण्यात आले. मात्र, सोसाटय़ाच्या वाऱयात प्लास्टिक कापड उडून गेल्याने मुख्य इमारतीत मोठय़ा प्रमाणात गळती लागली आहे. इमारतीवरील पत्रे व प्लास्टिक उडून जाऊ नये म्हणून ठेवलेले दगड कोसळून आत पडत असल्याने इमारतीत काम करणाऱया अधिकारी, कर्मचाऱयांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू झाल्याने अधिकारी, कर्मचाऱयांना जीव मुठीत धरूनच सध्या या इमारतीत काम करावे लागत आहे.

नव्या इमारतीचे काम निधीअभावी रखडले

या इमारती शेजारी वीज उपकेंद्र तसेच नवीन कार्यालयाच्या इमारतीचे काम हाती घेण्यात आले होते. यातील वीज उपकेंद्राचे काम मार्गी लागले, तर नवीन कार्यालयाच्या इमारतीचे काम सध्या निधीअभावी रखडले आहे. इमारत पूर्ण झाली असली, तरी दरवाजे, वीजपुरवठय़ाची सुविधा तसेच अन्य साहित्यासह अन्य बरीच कामे निधीअभावी रखडली आहेत. गतवषी या इमारतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते रखडल्याने सध्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱयांना धोकादायक बनलेल्या इमारतीत बसूनच काम करावे लागत आहे.

इमारतीत मोठय़ा प्रमाणात गळती

महावितरणच्या धोकादायक बनलेल्या इमारतीची कार्यकारी अभियंता मोहिते यांनी भेट देत पाहणी केली. इमारतीत मोठय़ा प्रमाणात गळती होत असल्याने तात्पुरत्या स्वरुपात नवीन इमारतीत स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, ही इमारत सर्व सामान हलविण्यासाठी अपुरी असून दरवाजे तसेच अन्य सुविधाही नाहीत. त्यामुळे या इमारतीत स्थलांतर करायचे कसे, असा प्रश्न कर्मचाऱयांना पडला आहे. नवीन इमारतीचे काम रखडल्याने नवीन जागेत कार्यालय स्थलांतरित करावे, यासाठी महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडे गेले वर्षभर पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्याची कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

किरीट सोमय्या यांच्याकडून कुडाळ बस स्थानकाच्या इमारतीची पाहणी

Anuja Kudatarkar

गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई

Anuja Kudatarkar

चौपदरीकरणास पुढील डिसेंबरची डेडलाईन!

Patil_p

चेकपोस्टवरील तपासणीत शिथिलता द्या

NIKHIL_N

अभिनंदनात उपहासात्मकता कशाला?

NIKHIL_N

कशेडी घाटात बर्निंग कारचा थरार

Patil_p