Tarun Bharat

मालवणी सुपुत्राचे माणुसकीचे दर्शन

Advertisements

 आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर पुन्हा वैद्यकीय सेवेत : कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी घेतला निर्णय

विशाल वाईरकर / कट्टा:

‘कोकणची माणसे साधी-भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी’ हे मराठीतील प्रसिद्ध गाणे कोकणी माणसाच्या जीवनावर आधारित आहे. कोकणी माणूस प्रेमळ, मायाळू असून समोरच्याला मदत करण्यासाठी कधीही, कुठेही नेहमी तत्पर असतो, असा या गाण्याचा भावार्थ आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हय़ातील मालवण तालुक्यातील वराड गावचे सुपुत्र आणि आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर. त्यांनी आयर्लंड येथे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या सेवेसाठी वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा प्रवेश करत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

सध्या कोरोना या महामारीने जगभरात थैमान घातले आहे. या महामारीने लाखो लोक मृत्युमुखी पडले. याच पार्श्वभूमीवर आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी कोरोनामुळे पुन्हा डॉक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. लिओ यांचा जन्म वराड येथील नसला, तरी त्यांच्या वडिलांचे मूळ गाव वराड आहे. आयर्लंडचे पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच आपल्या मूळ वराड या गावी आल्यानंतर आपल्याला खूप आनंद झाल्याचे लिओ यांनी म्हटले होते. आपली माणसे कशी प्रेमळ, मायाळू असतात हे या पहिल्या भेटीतच त्यांना कळले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत परदेशातील काही मंडळी होती. त्यांनाही याठिकाणी माणुसकीचे उत्तम दर्शन घडले होते. परंतु आज अडचणीच्या काळात पंतप्रधान म्हणून धुरा सांभाळताना लोकांच्या सेवेसाठी पुन्हा डॉक्टरी पेशा स्वीकारत त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

लिओ वराडकर हे आयरिश संसदेत निवडून जाण्यापूर्वी तेथील सेंट जेम्स या रुग्णालयात डॉक्टर तसेच जी. पी. म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. त्यात त्यांनी आरोग्यमंत्री या पदाची यशस्वी धुरा सांभाळली. आरोग्यमंत्री पद स्वीकारण्यापूर्वी एक वर्ष अगोदर म्हणजेच 2013 साली त्यांनी वैद्यकीय क्षेत्र सोडले होते. परंतु जगभरात सुरू झालेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तब्बल 7 वर्षांनी मागील महिन्यातच म्हणजे मार्चमध्ये पुन्हा वैद्यकीय सेवेत प्रवेश करत कोरोनाबाधितांना डॉक्टरी सेवा देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती तेथील आयरिश टाइम्सने दिली आहे.

 लिओ यांचे वडील भारतीय डॉक्टर आणि आई ही आयरिश परिचारिका आहे. एका बाजूला त्या देशाचा पंतप्रधान म्हणून काम करताना याच देशातील कोरोनामुळे 158 लोक मृत्युमुखी पडल्याने या जनतेची सेवा करण्यासाठी आपली मूळ डॉक्टरी सेवा स्वीकारत लिओ सध्या दुहेरी भूमिका प्रभावीपणे सांभाळत आहेत. त्यांच्या या प्रभावी कार्याची आयरिशचे आरोग्य सेवा कार्यकारी (एचएसई) यांनी दखल घेत लिओ यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. आरोग्य सेवेतील माजी आरोग्य कर्मचाऱयांनी लिओ यांच्या कार्याची दखल घेत या जागतिक महामारीच्या काळात पुन्हा आपली नोंदणी करावी व आरोग्य सेवेसाठी हातभार लावावा, असे आवाहनही केले. वराडकर आयर्लंडचे पंतप्रधान झाल्यानंतर मालवणी मुलुखाचे नाव जगभरात अभिमानाने घेतले जात होते. आजही पुन्हा एकदा या मालवणी सुपुत्राच्या कार्याने मालवणी मुलुखाचे नाव जगभरात अभिमानाने घेतले जात आहे. त्यांच्या कार्याने त्यांचे जगभर कौतुक केले जात आहे.

Related Stories

भाजप मनुवादी सरकारकडून ओबीसांना संपवण्याचा घाट

Patil_p

सुरेश मांजरेकर यांचे निधन

NIKHIL_N

गणपती गेले गावाला…चैन पडेना आम्हाला

Patil_p

चिपळुणात सांस्कृतिक केंद्रावर वृक्ष कोसळला!

Patil_p

‘कर्णबधीर’च्या शिक्षकांनीच बनवले आकाश कंदील!

Patil_p

भालचंद्र बाबांच्या जन्मोत्सव सोहळय़ास कणकवलीत प्रारंभ

NIKHIL_N
error: Content is protected !!