Tarun Bharat

मालवण समुद्रात गोव्याचा एलईडी ट्रॉलर पकडला

वार्ताहर / मालवण:

मालवण येथे समुद्रात 25 वावात एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करणाऱया गोवा माधुरी हलरणकर यांचा ‘पेस्काडोर 3’ हा एलईडी ट्रॉलर मत्स्य विभागाच्या गस्तीनौकेने मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पकडला. सहाय्यक मत्स्य आयुक्त ना. वि. भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी ही कारवाई केली. या ट्रॉलरवर कारवाईसाठी तहसीलदारांकडे प्रतिवेदन सादर करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे परवाना अधिकारी भालेकर यांनी सांगितले.

एलईडी, पर्ससीन मासेमारीस बंदी असतानाही मालवण समुद्रात सध्या परराज्यातील एलईडी ट्रॉलरद्वारे मासेमारी होत असल्याने पारंपरिक मच्छीमारांनी याबाबत आवाज उठविला होता. परंतु मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई होत नव्हती. मात्र, मंगळवारी पहाटे 4 च्या सुमारास मत्स्यविभागाची गस्त सुरू असताना 25 वाव समुद्रात एक ट्रॉलर अनधिकृतरित्या मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले. गस्तीनौकेवरील परवाना अधिकारी मुरारी भालेकर, पोलीस कर्मचारी सिद्धेश चिपकर, अमित हरमलकर यांनी हा ट्रॉलर पकडला. ट्रॉलरवरील कागदपत्रांची तपासणी केली असता, गोवा येथील ‘पेस्काडोर 3’ नावाचा माधुरी हलरणकर यांच्या मालकीचा ट्रॉलर असल्याचे दिसून आले. या ट्रॉलरवर एलईडी दिवे आढळले मात्र मासे सापडले नाहीत. ट्रॉलर जप्त करून मालवण बंदरात आणून अवरुद्ध करून ठेवण्यात आला आहे. सध्या कोरोनामुळे पोलीस यंत्रणेवर ताण असतानाही त्यांनी कारवाईसाठी पोलीस उपलब्ध करून दिल्याबद्दल परवाना अधिकारी भालेकर यांनी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांचे आभार मानले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मत्स्य विभागाने केलेल्या कारवाईबाबत पशु-दुग्ध-मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मत्स्य व्यवसाय आयुक्त राजीव जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

नवरात्रोत्सवानिमित्त नऊ रणरागिणींच्या कर्तृत्वाचा जागर

NIKHIL_N

दुर्लक्षित भाजी मंडई बनतेय अनैतिक व्यावसायाचे केंद्र?

Patil_p

मृत व्यक्तीचे स्मशानात घेतले ‘स्वॅब’

NIKHIL_N

घटनास्थळी सापडले दत्तारामचे घडय़ाळ

NIKHIL_N

‘टीजे मरीन’मधील अपघातप्रकरणी तिघांवर गुन्हा

Patil_p

Ratnagiri; उदय सामंत, योगेश कदमांना शिवसेनेचे दरवाजे बंद- खा. विनायक राऊत

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!