25 मोबाईल, एक दुचाकीसह रू. 2 लाखांचा ऐवज जप्त ‘जोर लगा के हैस्सा’ स्टाईल शटर वाकवणाऱयाला अटक : ओल्ड गोवा व पर्वरी हद्दीतील चोरींचेही कनेक्शन
प्रतिनिधी / फोंडा


देऊळवाडा-माशेल येथे मध्यरात्रीच्या सुमारास सात दुकाने फोडून धुमस्टाईलने फरार झालेल्या चोरांच्या टोळक्यापैकी मुंख्य सुत्रधाराच्या मुसक्या आवळण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. अल्लाबक्ष मोहम्मद अली शेख (32, मूळ हल्याळ कारवार, रा. बेती पर्वरी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून विविध चोरीमधील मोबाईल, स्कूटर व इतर एकत्रित साहित्यासह सुमारे रू. 2 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सदर चोरीची घटना गुरूवार 4 जून रोजी फोंडा पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली होती. या घटनेचे कनेक्शन यापुर्वी पर्वरी व ओल्ड गोवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या चोरीचांही समावेश आहे.
फेंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माशेल येथील कामाक्षी मोबाईल दुकानदार दिक्षीता नाईक या युवतीने सुमारे रू. 43 हजार किमतीचे 5 मोबाईल चोरटय़ानी दुकानाचे शटर वाकवून पळविल्याची तक्रार दाखल केली होती. अन्य सहा दुकानदारांनी तक्रार देण्यास नकार दर्शविल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी 3 जून रोजी एकूण सात दुकानात शटर वाकवून चोरी करण्यात आली होते. त्यापैकी चार दुकानांचे साहित्य पळविण्यात चोरटय़ांनी यश मिळवले होते.
माशेल चोरीतील सर्व साहित्य जप्त
चोरटय़ांनी पळविलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यात रेनकोट, छत्र्या, बुट तसेच मोबाईलचा समावेश आहे. मजेशीर किस्सा असा मिठाई दुकानात पैसे न मिळाल्याने पेढे खाल्याची कबूलीही संशयितानी तपासाअंती दिली आहे. ओल्ड गोवा येथून दुचाकी पळविली असून पर्वरी येथेही चोरी केल्याची कबूली दिली आहे. चोरटय़ाच्या छबी अडकलेली सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याने तपासकामात महत्चाची ठरली. चोरटय़ाकडून सापडलेल्या साहित्यामध्ये 25 मोबाईल, 1 एक्टीवा स्कूटर, 1 कॅमेरा, मोबाईल चार्जर, छत्र्या, रेनकोट यांच्यासह एकूण अंदाजे रू. 2 लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
चोरटय़ांचा जोर लगा के हैस्सा फॉर्मुला
सदर चोरटे मूळ कारवार येथील असून बेती-पर्वरी येथे भाडय़ाच्या खोलीत राहत आहे. त्याची चारजणांची टोळी असून मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावरील दुकाने टार्गेट करीत असत. मध्यभागी कुलूप नसलेले शटर हेरून ते जमीन व शटर यांच्यात खळी निर्माण केल्य़ानंतर एकदम जोर लगा के हैस्सा करीत वाकवण्यात येत असे, वाकवलेल्या शटरमधून एकटा आत शिरल्यानंतर बाकीचे पहारा देणे असा चोरीचा ‘जोर लगा गे हैस्सा’ फॉर्मुला आरंभला होता. आश्चर्य ऐवढेच की कोरोना लॉकडाऊनकाळात प्रत्येक नाक्यावर गस्तीवर पोलीस तैनात असताना पर्वरी येथील चोरटे बाणस्तारीहून माशेलपर्यत पोचतात कसे ? अन्य तीन संशयित फरारी असून त्याचा शोध जारी आहे. याप्रकरणी संशयित अल्लाबक्ष याच्याविरोधात भा.द.स. 454, 457, 380 कलमाखाली गुन्हा नेंदवून काल सोमवारी अटक करण्यात आली आहे. चोरीच्या साहित्याची चौकशीसाठी पर्वरी व ओल्ड गोवा पोलिस स्थानकाशी संपर्क करण्यात येत असल्याची माहिती निरीक्षक मोहन गावडे यांनी दिली आहे.
फोंडा पोलिसांचे कौतुक
कोरोना लॉकडाऊन काळात अपुऱया पोलिस कर्मचाऱयासह काम करणाऱया फोंडा पोलिसांनी टोळीच्या म्होरक्याला बेती पर्वरी येथून गजाआड केले आहे. निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित उमर्ये, विभीनव शिरोडकर, हवालदार केदारनाथ जल्मी, चेतन गावडे, अमेय गोसावी, वंदेश सतरकर, जयवंत भरतू, सर्वेश गावकर, साईनाथ कोपर्डेकर या टिमने ही कारवाई केली. तीव्रगतीने चोरीचा छडा लावल्यामुळे देऊळवाडा येथील दुकानदारांनी फोंडा पोलिसांचे कौतुक केले आहे.