Tarun Bharat

मासेमारी बंद, आंदोलन सुरू

न्याय मिळेपर्यंत साखळी उपोषण : पारंपरिक मच्छीमार ‘आर या पार’च्या पवित्र्यात : मालवणला कडक पोलीस बंदोबस्त

प्रतिनिधी / मालवण:

एलईडी दिव्यांच्या साहय़ाने होत असलेली बेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारी तात्काळ बंद व्हावी, या एका मागणीवर प्रामुख्याने जोर देत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, सिंधुदुर्गने येथील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयासमोर शुक्रवारी बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात केली. केंद्र आणि राज्याचे बदलते नियम पारंपरिक मच्छीमारांच्या गळय़ाभोवती मत्स्य दुष्काळाचा फास कसा घट्ट आवळताहेत आणि या फासातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी पारंपरिक मच्छीमारांची सुरू झालेली तडफड असेच पहिल्या दिवसाच्या आंदोलनाचे वर्णन करता येईल.

परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सची दादागिरी मोडीत काढण्याबरोबरच बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारीचा भस्मासूर गाडण्यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. शुक्रवारी रापण व गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांनी आपला व्यवसाय आणि मासे विक्री बंद ठेवत एकजुटीचे दर्शन घडविले. मालवणच्या मासळी मार्केटमध्ये शुकशुकाट होता. आंदोलनात महिलांचा सहभाग उत्स्फूर्त होता. जिल्हय़ातील स्थानिक ट्रॉलर व्यावसायिकांनीही उपोषणाला पाठिंबा दर्शवित आपल्यालाही परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स आणि एलईडी मासेमारीची प्रचंड आर्थिक झळ बसत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी मालवणसह देवगड आणि वेंगुर्ल्यातील मच्छीमार प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी हजेरी लावली. या आंदोलनास मच्छीमारांचा मिळणारा संभाव्य पाठिंबा जाणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगाकाबू पथक तैनात करण्यात आले होते.

पळवाटा सांगू नका, नियमांची अंमलबजावणी करा!

सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नागनाथ भादुले यांचे रत्नागिरीहून मालवणात आगमन झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या उपस्थितीत भादुले यांच्याशी मच्छीमार शिष्टमंडळाची चर्चा झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर, भाऊ मोरजे, सुधीर जोशी, संजय केळुसकर, देवगडचे संजय बादेकर, ज्ञानेश्वर खवळे, शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन परुळेकर, शेलटकर आदी उपस्थित होते.

शासनाने मत्स्य विभागाला नौकांची तपासणी करायला सांगितली होती, ती नीट झालेली नाही. त्यामुळे अनधिकृत पर्ससीन नौका आजही मासेमारी करत आहेत. वेंगुर्ल्यामध्ये जर मत्स्य विभागाला नौका तपासणीसाठी सहकार्य मिळाले नसेल, तर त्या सबबी आम्ही का ऐकायच्या? तहसीलदारांनी पर्ससीन नौका जप्तीचे आदेश दिले असताना, ती नौका मत्स्य विभागाला अद्याप जप्त करता आलेली नाही, अशी मत्स्य विभागाच्या अकार्यक्षमपणाची कितीतरी उदाहरणे देता येतील. राज्य मत्स्य विभागाची हद्द 12 सागरी मैल<ापर्यंत असेल, तर 12 सागरी मैलापलिकडे मासेमारी करण्याची परवानगी त्यांना कुठल्या आधारे दिली गेली, याची लेखी माहिती आपणास दिली जावी, अशी जोरदार मागणी मच्छीमारांनी केली. देवगड बंदरात हायस्पीड ट्रॉलरला मिळालेल्या मासळीचा लीलाव करण्यासाठी ठराविक व्यापाऱयांनाच बोलविले गेल्याने लाखो रुपयांच्या मासळीला योग्य भाव मिळाला नाही, अशी तक्रार देवगडमधील मच्छीमारांनी केली.

2016 मधील निर्णय, 2017 मध्ये रद्द

केंद्र व राज्य शासनाने एलईडी मासेमारीस बंदी घातली आहे. मात्र, केंद्र शासनाने बंदीच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उभी केलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारची बंदी केवळ दिखावा ठरली आहे. राज्य शासनाने स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष उभारण्यासाठी कोणतीही तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली नाही, याविषयी मच्छीमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, 28 मार्च 2016 आणि 19 सप्टेंबर 2016 च्या पत्रानुसार राष्ट्रीय सागरी हद्दीत मासेमारी करण्याबाबत जे आदेश होते, ते 2017 मधील पत्राच्या अनुषंगाने रद्द झाल्याचे मच्छीमारांना कळविण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय हद्दीत होणाऱया मासेमारीसंदर्भात कुठलाही हस्तक्षेप राज्य मत्स्य विभाग करू शकत नाही, असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.

झारीतील शुक्राचार्य कोण?

गतवर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मालवण दौऱयावर आले असता, ते स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाची घोषणा करतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु तसे काहीच झाले नाही, अशी माहिती आज भादुले यांच्याशी चर्चेवेळी स्पष्ट झाले. मग ऐनवेळी स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष विचलित करणारा झारीतील शुक्राचार्य कोण, याविषयीची चर्चा मच्छीमारांमध्ये सुरू झाली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या हद्दीत पर्ससीन नेट मासेमारीवर निर्बंध घातले असले, तरी राष्ट्रीय हद्दीत मासेमारीची पळवाट कुणी काढून दिली, असा मुद्दाही उपस्थित होत आहे.

आचऱयातील पर्ससीन विरोधात गुन्हा दाखल करणार!

दरम्यान, तहसीलदारांनी जप्तीचे आदेश देऊनही पर्ससीन नौका ताब्यात न देणाऱया आचऱयातील नौका मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत भादुले यांनी तयारी दर्शविली आहे. गुन्हा दाखल करण्याबाबत त्यांनी पोलीस निरीक्षकांकडून सर्व बाबींची पडताळणी करून घेतली.

Related Stories

तीन वीज खांब कोसळल्याने संगमेश्वरजवळ महामार्ग ठप्प

Patil_p

एलईडी, पर्ससीनविरोधात दापोलीत बेमुदत उपोषण

Patil_p

रानटी हत्ती आता बारमाही

Anuja Kudatarkar

चिपळुणात 75 हजाराचा ऐवज चोरीस

Patil_p

धुवाँधार पावसामुळे चिपळूण जलमय!

Patil_p

दिनानाथ वेर्णेकर यांचे निधन

Anuja Kudatarkar