Tarun Bharat

मास्क, सॅनिटायझर, डेटॉलवर कोटय़वधींची उलाढाल

मागील सहा महिन्यांत व्यवसाय तेजीत

प्रतिनिधी/ पणजी

कोरोना महामारीच्या काळात सर्व व्यवसाय मंदावले मात्र, मास्क, सॅनिटायझर व डेटॉलचा विक्रमी व्यवसाय झाला. डेटॉलची तर कमतरता भासत आहे. या तिन्ही वस्तूंवरील मागील सहा महिन्यांची उलाढाल व व्यवसाय कोटींच्या घरात पोहोचला आहे. सॅनिटायझर व मास्कला तर अजूनही मोठी मागणी आहे.

गोव्यातील प्रत्येक नागरिकांच्या तोंडावर आज मास्क दिसत आहे. घराबाहेर पडणारी प्रत्येक व्यक्ती मास्क लावल्याशिवाय बाहेर पडत नाही. त्यामुळे मास्क विक्रीचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढला आहे. आज मार्केटमध्ये बऱयाच दुकानातून मास्कची विक्री सुरू आहे. त्याचबरोबर फुटपाथवर बसूनही मास्कची विक्री केली जाते. राज्यातील 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी मागील सहा महिन्यांत किमान 60 ते 70 लाख मास्क खरेदी केले असतील. एका मास्कची किंमत सुमारे 30 ते 150 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांत मास्कच्या विक्रीत किती मोठी उलाढाल झाली असेल याचा अंदाज बांधता येईल. एकेका व्यक्तीने मागील सहा महिन्यांत 8 ते 10 किंवा त्यापेक्षाही जास्त मास्क खरेदी केले असतील. नोकरीसाठी जाणाऱया लोकांनी तर मोठय़ा प्रमाणात मास्कची खरेदी केलेली आहे. मास्कच्या विक्रीतून कोटींची उलाढाल झालेली आहे. मात्र, सरकारला यातून फार मोठा फायदा झालेला नाही.

सॅनिटायझरवरही कोटींची उलाढाल

सॅनिटायझरच्या विक्रीतून तर कोटींची उलाढाल झालेली आहे. कोरोना महामारीमुळे सॅनिटायझर ही अत्यावश्यक वस्तू बनलेली आहे. शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, उद्योग, व्यवसाय, बँकांसह घरातही आज सॅनिटायझरचा वापर होत आहे. मागील सहा महिन्यांत शासकीय कार्यालयातच काही कोटी रुपयांच्या सॅनिटायझरची खरेदी केली गेली आहे. याव्यतिरिक्त खासगी कार्यालये, उद्योग-व्यवसाय व बॅकांनीही आजपर्यंत लाखो रुपयांचे सॅनिटायझर खरेदी केलेले आहे.  बँका व सरकारी कार्यालयात महिन्याला सॅनिटायझरच्या कित्येक बाटल्या खाली होतात. त्याचबरोबर उद्योग व व्यवसायामध्येही तीच स्थिती आहे. सॅनिटायझर 45 रुपयांपासून 250 रुपयापर्यंत विकले जाते. मोठय़ा बाटलीची किंमत त्यापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे सॅनिटायझरची निर्मिती करणाऱया कंपन्यांनी मागील सहा महिन्यांत मोठा व्यवसाय केला आहे.

डेटॉलची कमतरता जाणवत होती

डेटॉलला मागील सहा महिन्यांत मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली आहे. डेटॉलची कमतरता आजही भासत आहे. त्यामुळे सेव्हलॉन, सेफलॉन यांनाही मागणी वाढली आहे. आज प्रत्येक घरात कार्यालयात व उद्योगात सॅनिटायझेशनसाठी डेटॉलचा वापर केला जातो. कोरोनाची दहशत प्रचंड प्रमाणात वाढल्याने लोकांनी सुरक्षिततेवर जास्त भर दिला आहे. बाजारात सध्या जीवनावश्यक वस्तुंसोबतच या तिन्ही वस्तूंना मोठी मागणी आहे. पुढील किमान चार ते पाच महिने हा व्यवसाय तेजीत राहणार आहे. या वस्तुंवरील उलाढाल शेकडो कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

कोलवा सर्कल जवळ कारने घेतला पेट

Amit Kulkarni

ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संभ्रमात

Amit Kulkarni

दामु नाईक यांनी गोमंतकीयांची माफी मागावी

Patil_p

वेर्णा औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱयांच्या निदर्शनात पोलिसांचा हस्तक्षेप

Amit Kulkarni

शांतादुर्गा किटलकरीण संस्थान समितीची बिनविरोध निवड

Amit Kulkarni

मोन्सेरात यांचा शुभ दीपावलीचा बॅनर्स फाडला

Amit Kulkarni