प्रतिनिधी/मिरज
शहरातील स्टेशन रोडवर गांजा तस्करी सुरू असणाऱ्या अड्डय़ावर शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 40 हजार रुपये किंमतीचा अडीच किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी तरबेज अहमद शेख (वय 25, रा. अमर टॉकीजसमोर, ख्वॉजा वसाहत झोपडपट्टी, मिरज) याला अटक करण्यात आली आहे. काल, सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तरबेज शेख हा तरुण स्टेशन रोडवरील आकाश फॅशन स्टुडीओ व शान सायकल सर्व्हीस या दुकानाच्या पाठीमागे थांबून गांजाची मोठय़ा प्रमाणात तस्करी करीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी शहर पोलिसांनी तेथे छापा टाकला असता तरबेज हा गांजाची विक्री करीत असताना मिळून आला. पोलिसांनी त्याला पकडून झडती घेतली असता, त्याच्याजवळ सुमारे दोन किलो, 560 ग्रॅम वजनाचा ओला गांजा मिळून आला. या गांजाची किंमती सुमारे 40 हजार रुपये आहे. पोलिसांनी सदर गांजा जफ्त करुन तरबेज शेख याला अटक केली आहे.
दरम्यान, शहरात विशेष करुन दर्गा रोड ते स्टेशन रोड परिसरात गांजाची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नशेबाज तरुणांच्या टोळ्या याच भागात सक्रिय असतात. गांजाची नशा करुन प्रवाशांना व नागरिकांना लुबाडण्याच्याही घडत आहेत. त्यामुळे नशेखोर टोळ्यांबरोबरच गांजा आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाऱयांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.


previous post