Tarun Bharat

मिरजेत 20 हजारांच्या बदल्यात साडेचार लाखांची मागणी; महिला सावकारांवर गुन्हा

प्रतिनिधी/मिरज

तालुक्यातील बेळंकी येथे खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून एकाच घरातील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच मिरज शहरात खासगी सावकारीचे दुसरे प्रकरण उजेडात आले आहे. कर्जाऊ घेतलेल्या 20 हजार रुपयांवर 30 टक्के व्याजाची आकारणी करुन त्या बदल्यात साडेचार लाख रुपयांची मागणी करून कोरे स्टँप आणि कोरे धनादेश घेऊन मिळकत बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मीनाज महंमदगौस शेख आणि यास्मिन अकबर बागवान (दोघी रा. मिरज) या खासगी सावकार महिलांवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शैला अनिल मिरजे (वय 40, रा. डोणगे गल्ली) यांनी फिर्याद दिली आहे.

शैला मिरजे यांनी मीनाजगौस शेख आणि यास्मिन बागवान यांच्याकडून 2017 साली 30 टक्के व्याज दराने 20 हजार रुपये घेतले होते. दरमहा सहा हजार रुपये व्याज देण्याच्या अटीवर जुलै 2019 अखेर व्याजाची रक्कम एक लाख रुपये आणि पूर्वी केलेल्या एक लाख रुपयांच्या गहाण कराराची रक्कम अशा एकूण दोन लाख रुपयांचे करारपत्र संबंधीत महिलांनी मिरजे यांच्याकडून करवून घेतले. सदरचे दोन लाख फेडण्यासाठी मिरजे यांना बचत गटाचे कर्ज देण्याचे अमिष दाखविण्यात आले. त्यापोटी संबंधीत सावकार महिलांनी शंभर रुपयांचा कोरो स्टँप, दोन कोरे धनादेश, आधार कार्ड आणि पॅनकार्डचे झेरॉक्स मागवून घेतले.

मात्र, कर्जप्रकरण मंजूर झाले नाही. त्यामुळे मिरजे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र एका खासगी फायनान्स कंपनीकडे तारण ठेवण्यात आले. त्यावर रक्कम देऊनही मुळ कागदपत्रे संबंधीत महिलांनी परत दिले नाहीत. उलट मिरजे यांना तुमच्याकडून साडेचार लाख रुपये येणे आहेत, असे सांगत सदरची रक्कम देण्यासाठी तगादा लावला. पैशांच्या बदल्यात तुमची मिळकत खरेदी करुन द्या अन्यथा, तुमच्या मुलांना खोट्या गुह्याखाली अडकू, अशी धमकी देऊन सदर महिलांनी शिवीगाळ केल्याची तक्रार मिरजे यांनी शहर पोलिसात दिली आहे. या फिर्यादीनुसार दोघा महिलांवर खासगी सावकार अधिनियाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

राज्यातील 63 नाट्यगृहे एकाच छताखाली आणा : अभिनेते प्रशांत दामले

Archana Banage

नेर्ले येथे वाळूचा ट्रक पलटी, चालक जखमी

Archana Banage

‌उच्च न्यायालयाची बंदी झुगारत येरळा नदीपात्रातील वाळू उपसा सुरुच

Archana Banage

सांगली : एकट्या जीवनधारा कोविड केअर सेंटरचेच ऑडिट कशासाठी?

Archana Banage

अंकलखोपचे नितीन नवले राष्ट्रवादीत

Archana Banage

मालगांव येथील बावाफन उरूस रद्द

Archana Banage