Tarun Bharat

मिळेल तिथे प्रवेश घ्या, अन्यथा वर्ष वाया जाईल!

Advertisements

उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांचे कॉलेज विद्यार्थ्यांना आवाहन

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील दहा महाविद्यालयांत प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया पूर्णत्वास आली असून   कोणत्याही महाविद्यालयास विद्यार्थी क्षमता वाढविण्यास मान्यता देण्यात येणार नाही. त्यामुळे तेथे प्रवेशासाठी प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनी जेथे मिळेल तेथे प्रवेश घ्यावा, अन्यथा त्यांचे एक वर्ष वाया जाणार आहे, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांनी दिली आहे.

 प्रथमवर्ष प्रवेशासाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले असून आपल्या आवडीच्या महाविद्यालयातच प्रवेश मिळेल या आशेवर न राहता विद्यार्थ्यांनी अन्य महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे ते म्हणाले. राज्यात 7 सरकारी महाविद्यालयांसह 34 महाविद्यालये आहेत. तेथे प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अनेक महाविद्यालयात ती यापूर्वीच पूर्णत्वास आली आहे. दि. 6 सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे.

 दहा विद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण

 प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेल्या महाविद्यालयामध्ये मिरामार येथील धेंपो कला व विज्ञान महाविद्यालय, म्हापसा येथील सेंट झेवियर कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, कुजिरा बांबोळी येथील धेंपो वाणिज्य महाविद्यालय, मिरामार येथील व्ही एम साळगावकर महाविद्यालय, मडगाव येथील दामोदर वाणिज्य महाविद्यालय, मडगाव येथील चौगुले महाविद्यालय, कोंब मडगाव येथील कारे कायदा महाविद्यालय, नावेली येथील रोझरी कला व वाणिज्य महाविद्यालय, आणि म्हापसा येथील सारस्वत महाविद्यालय, यांचा समावेश आहे.

 सध्यस्थितीत वरील महाविद्यालयात प्रवेशासाठी सुमारे 900 विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. परंतु तेथील जागा भरलेल्या असल्याने त्यांना आणखी जागा वाढविण्यास मान्यता देण्यात येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पर्यायी महाविद्यालयांचा आधार घ्यावा, असे लोलयेकर म्हणाले.

 प्रवेश प्रक्रिया सुरु असलेली महाविद्याले

 पुढील दोन दिवस प्रवेश प्रक्रिया चालणार असलेल्या महाविद्यालयामध्ये नुवे येथील कार्मेल महाविद्यालय, कुंकळी एज्युकेशनल सोसायटी कला व वाणिज्य महाविद्यालय, सुळकर्णे केपे येथील डॉन बॉस्को कृषी महाविद्यालय, धारबांदोडा येथील गोपाळ गावकर मल्टि फेकल्टी महाविद्यालय, आसगाव बार्देश येथील ज्ञानप्रसारक महाविद्यालय, देळे काणकोण येथील मल्लिकार्जून कला व वाणिज्य महाविद्यालय, पिलार येथील फा. आग्नेल कला व वाणिज्य महाविद्यालय, फर्मागुडी फोंडा येथील जीव्हीएम महाविद्यालय, हरमल येथील गणपत पार्सेकर महाविद्यालय, झुवारीनगर वास्को येथील मुरगाव शैक्षणिक संस्थेचे महाविद्यालय, फर्मागुडी येथील पीईएस महाविद्यालय, शिरशिरे बोरी येथील स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक महाविद्यालय, कुठ्ठाळी येथील सेंट जोझफ वाझ महाविद्यालय, पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी महाविद्यालय यांचा समावेश आहे.

प्रवेश शुल्क एकरकमी भरण्यापासून सूट

कोविड महामारीचा विचार करता यंदा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एकरकमी फी भरण्यापासून सूट देण्यात आली असून प्रारंभिक नोंदणी फी म्हणून 855 रुपये भरावे लागणार आहेत. त्यातील 225 रुपये हे आयएआयएमएसचे असतील तर 630 रुपये नोंदणीसाठीचे असतील. उर्वरित सर्व फी ऑक्टोबर, डिसेंबर 2020 आणि फेब्रुवारी 2021 या महिन्यात तीन हप्त्यांनी भरता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवर आर्थिक ताण पडणार नाही, असे लोलयेकर म्हणाले. यंदा सुमारे 13000 विद्यार्थी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतील असा अंदाज आहे.

फी संबंधी गैरसमज पसरवू नये

दरम्यान, विद्यार्थ्यांना भरावी लागणारी 855 रुपये प्रारंभिक फी ही उच्च शिक्षण संचालनालय गोळा करणार असल्याची अफवा काही विद्यार्थ्यांमधून पसरविण्यात आली होती. त्यासंबंधी विचारले असता, ’एखाद्या विद्यार्थ्याने तशी फी भरली असल्यास पावती सादर करावी’, असे लोलयेकर म्हणाले. अशा अफवा जास्त करून विद्यार्थ्यांमधून नव्हे तर एखाद्या महाविद्यालयातर्फेच पसरविण्यात आली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

द्वितीय व तृतीय वर्षासाठी प्रवेश सुरू द्वितीय व तृतीय वर्षासाठीही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी केवळ 225 रुपये आयएआयएमएस फी म्हणून भरावे लागणार आहेत. उर्वरित फी तीन हप्त्यांनी फेडता येणार आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे श्री. लोलयेकर यांनी सांगितले.

Related Stories

मडगाव पालिकेत दिपाली सावळ यांचा विक्रम

Amit Kulkarni

मृदुला सिन्हा यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

Patil_p

मंत्र्यांचा जोरदार प्रचार, विरोधकांची सतावणूक

Patil_p

शैक्षणिक वर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस देखरेख

Amit Kulkarni

खरे फटिंग कोण याचे उत्तर जनतेला द्यावे

Patil_p

पुन्हा प्रमोद राज्य!

Amit Kulkarni
error: Content is protected !!