Tarun Bharat

मिशन चेन्नई! ‘ब्रिस्बेन’ची पुनरावृत्ती होणार का?

Advertisements

भारतासमोर चौथ्या डावात विश्वविक्रमी 420 धावांचे ‘टार्गेट’

चेन्नई / वृत्तसंस्था

19 दिवसांपूर्वी ब्रिस्बेनमध्ये 328 धावांचे टार्गेट यशस्वीरित्या गाठलेल्या भारतीय संघासमोर इंग्लंडविरुद्ध चेन्नईत पहिल्या कसोटी सामन्यात 420 धावांचे विश्वविक्रमी आव्हान असून यापूर्वी ब्रिस्बेन कसोटीत गाजवलेल्या भीमपराक्रमाची भारतीय संघ येथेही पुनरावृत्ती करणार का, हे आज सामन्यातील शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल. ब्रिस्बेनमध्ये भारताने 328 धावांचे टार्गेट पार केले होते. चेन्नईत इंग्लंडसमोर खेळताना भारतासमोर 420 धावांचे विश्वविक्रमी आव्हान आहे.

सोमवारी पाहुण्या इंग्लंड संघाचा दुसरा डाव अश्विनच्या भेदक गोलंदाजीसमोर जरुर गडगडला. पण, चौथ्या डावात विश्वविक्रमी 420 धावांचे विराट आव्हान असताना चौथ्या दिवसअखेर विराटसेनेची 1 बाद 39 अशी खराब स्थिती होती. रोहित शर्मा (12) स्वस्तात बाद झाल्यानंतर शुभमन गिल (नाबाद 15) व चेतेश्वर पुजारा (नाबाद 12) यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. भारताला या सामन्यात 9 गडी हाताशी असताना विजयासाठी आणखी 381 धावांची गरज आहे.

चौथ्या डावात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम सध्या विंडीजच्या खात्यावर असून त्यांनी 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 418 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. येथे भारतासमोर त्या तुलनेत विश्वविक्रमी आव्हान असेल.

भारताने सोमवारी 6 बाद 257 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर अश्विन-सुंदर यांच्या धमाकेदार भागीदारीमुळे सर्वबाद 337 धावांपर्यंत मजल मारली. मात्र, फॉलोऑन लादण्याचा पर्याय खुला असतानाही इंग्लंडने त्याविरुद्ध निर्णय घेत दुसऱया डावाला सुरुवात केली. तोवर खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक बनली आणि अश्विनने याचा पुरेपूर लाभ घेत इंग्लंडच्या डावाला मोठे खिंडार पाडले.

अश्विनने दुसऱया डावातील पहिल्याच चेंडूवर रोरी बर्न्सला पहिल्या स्लीपवरील अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद करत इंग्लंडला धक्का दिला. 37 चेंडूत 16 धावा करणारा सिबली देखील अश्विनचाच बळी ठरला. इशांतने लॉरेन्सला पायचीत करत 300 बळींचा माईलस्टोन सर केला. एका बाजूने सहकारी फलंदाज बाद होत असताना रुटने 32 चेंडूत जलद 40 धावा फटकावल्या. मात्र, तो ही पुढे बुमराहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.

ऑलि पोप (28), बटलर (24) व डॉम बेस (25) यांनी समयोचित योगदान दिले. इंग्लंडने आपला दुसरा डाव घोषित करण्याऐवजी पुढे खेळत राहण्यावर भर दिला. तिसऱया दिवशी एकूण 15 फलंदाज बाद झाले. अश्विनने भेदक गोलंदाजी साकारली. पण, शाहबाज नदीम निष्प्रभ ठरत असताना विराटने वॉशिंग्टनच्या ऑफब्रेक गोलंदाजीचा का वापर करुन घेतला नाही, याचा उलगडा झाला नाही.

भारतीय संघ पुन्हा फलंदाजीला आल्यानंतर डावखुरा फिरकीपटू जॅक लीचने रोहितला लेगस्टम्पच्या रोखाने टाकलेला चेंडू ऑफस्टम्पवर जाऊन आदळला आणि येथे यजमान संघाला मोठा धक्का बसला. विश्वविक्रमी धावांचा पाठलाग करताना रोहितचे बाद होणे फटका देणारे ठरेल की ब्रिस्बेनप्रमाणे येथेही विक्रमी विजय खेचण्यात भारत यशस्वी ठरेल, हे आज येथे सामन्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.

धावफलक

इंग्लंड पहिला डाव- सर्वबाद 578.

भारत पहिला डाव- रोहित शर्मा झे. बटलर, गो. आर्चर 6 (9 चेंडूत 1 चौकार), शुभमन गिल झे. अँडरसन, गो. आर्चर 29 (28 चेंडूत 5 चौकार), पुजारा झे. बर्न्स, गो. बेस 73 (143 चेंडूत 11 चौकार), विराट कोहली झे. पोप, गो. बेस 11 (48 चेंडू), अजिंक्य रहाणे झे. रुट, गो. बेस 1 (6 चेंडू), ऋषभ पंत झे. लीच, गो. बेस 91 (88 चेंडूत 9 चौकार, 5 षटकार), वॉशिंग्टन सुंदर नाबाद 85 (138 चेंडूत 12 चौकार, 2 षटकार), अश्विन झे. बटलर, गो. लीच 31 (91 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), शाहबाज नदीम झे. स्टोक्स, गो. लीच 0 (12 चेंडू), इशांत शर्मा झे. पोप, गो. अँडरसन 4 (11 चेंडूत 1 चौकार), बुमराह झे. स्टोक्स, गो. अँडरसन 0 (2 चेंडू). अवांतर 6. एकूण 95.5 षटकात सर्वबाद 337.

गडी बाद होण्याचा क्रम

1-19 (रोहित, 3.3), 2-44 (शुभमन, 9.2), 3-71 (विराट, 24.4), 4-73 (रहाणे, 26.3), 5-192 (पुजारा, 50.4), 6-225 (पंत, 56.4), 7-305 (अश्विन, 86.2), 9-323 (इशांत, 93.5), 10-337 (बुमराह, 95.5).

गोलंदाजी

अँडरसन 16.5-5-46-2, आर्चर 21-3-75-2, स्टोक्स 6-1-16-0, लीच 24-5-105-2, बेस 26-5-76-4, रुट 2-0-14-0.

इंग्लंड दुसरा डाव ः रोरी बर्न्स झे. रहाणे, गो. अश्विन 0 (1 चेंडू), डॉम सिबली झे. पुजारा, गो. अश्विन 16 (37 चेंडूत 2 चौकार), डॅन लॉरेन्स पायचीत गो. इशांत 18 (47 चेंडूत 1 चौकार), जो रुट पायचीत गो. बुमराह 40 (32 चेंडूत 7 चौकार), बेन स्टोक्स झे. पंत, गो. अश्विन 7 (12 चेंडूत 1 चौकार), ऑलि पोप झे. रोहित, गो. नदीम 28 (32 चेंडूत 3 चौकार), जोस बटलर यष्टीचीत पंत, गो. नदीम 24 (40 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), डॉम बेस पायचीत गो. अश्विन 25 (55 चेंडूत 3 चौकार), जोफ्रा आर्चर त्रि. गो. अश्विन 5 (10 चेंडू), जॅक लीच नाबाद 8 (18 चेंडूत 2 चौकार), जेम्स अँडरसन झे. व गो. अश्विन 0 (2 चेंडू). अवांतर 7. एकूण 46.3 षटकात सर्वबाद 178.

गडी बाद होण्याचा क्रम

1-0 (बर्न्स, 0.1), 2-32 (सिबली, 10.6), 3-58 (लॉरेन्स, 15.3), 4-71 (स्टोक्स, 18.1), 5-101 (रुट, 23.5), 6-130 (पोप, 28.4), 7-165 (बटलर, 41.2), 8-167 (बेस, 42.1), 9-178 (आर्चर, 46.1), 10-178 (अँडरसन, 46.3).

गोलंदाजी

रविचंद्रन अश्विन 17.3-2-61-6, शाहबाज नदीम 15-2-66-2, इशांत शर्मा 7-1-24-1, जसप्रित बुमराह 6-0-26-1, वॉशिंग्टन सुंदर 1-0-1-0.

भारत दुसरा डाव ः रोहित शर्मा त्रि. गो. लीच 12 (20 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), शुभमन गिल खेळत आहे 15 (35 चेंडूत 3 चौकार), चेतेश्वर पुजारा खेळत आहे 12 (23 चेंडूत 1 चौकार). अवांतर 12. एकूण 13 षटकात 1 बाद 39.

गडी बाद होण्याचा क्रम

1-25 (रोहित, 5.3).

गोलंदाजी

जोफ्रा आर्चर 3-2-13-0, जॅक लीच 6-1-21-1, जेम्स अँडरसन 2-1-2-0, डॉम बेस 2-0-3-0.

कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारे भारतीय गोलंदाज

गोलंदाज / सामने / बळी

अनिल कुंबळे / 132 / 619

कपिलदेव / 131 / 434

हरभजन सिंग / 103 / 417

रविचंद्रन अश्विन / 75 /386

झहीर खान / 92 / 311

इशांत शर्मा  98 / 300

इशांतचे कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी

अनुभवी जलद गोलंदाज इशांत शर्मा सोमवारी 300 कसोटी बळी घेणारा सहावा भारतीय व त्यातील तिसरा जलद गोलंदाज ठरला. इंग्लंडच्या दुसऱया डावात डॅन लॉरेन्सला आत घुसलेल्या एका जलद चेंडूवर पायचीत करत त्याने हा माईलस्टोन सर केला. अनिल कुंबळे (619), कपिल (434), अश्विन (377), हरभजन (417), झहीर खान (311) यांनी यापूर्वी हा टप्पा गाठला. 32 वर्षीय इशांतने 98 सामन्यात 300 वा बळी नोंदवला. त्याने हा टप्पा सर करताच बीसीसीआयने ट्वीटरवर त्याचे अभिनंदन केले. आयसीसीने देखील ट्वीट करत इशांतच्या पराक्रमाची आवर्जून नोंद घेतली. इशांतने 11 वेळा डावात 5 तर एकदा सामन्यात 10 बळी घेतले आहेत. उमद्या वयात त्याने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगविरुद्ध टाकलेले भेदक स्पेल आजही भारतीय क्रिकेट वर्तुळात सातत्याने चर्चेत राहत आले आहेत.

इशांतने 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी पदार्पण केले असून अलीकडे ऑस्ट्रेलिया दौऱयात तो कमरेच्या वेदनेमुळे खेळू शकला नव्हता. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध मालिकेत त्याने पुनरागमन नोंदवले. कसोटीत 300 बळींचा टप्पा गाठण्यासाठी इशांतला त्या तुलनेत मात्र अधिक सामने खेळावे लागले आहेत. अश्विनने अवघ्या 54 सामन्यातच हा टप्पा गाठला असून त्यानंतर कुंबळे (66), हरभजन (72), कपिल (83) व झहीर खान (89) यांचा क्रमांक लागतो. इशांतने हा टप्पा गाठण्यासाठी 98 सामने घेतले.

पहिल्या डावात वॉशिंग्टन सुंदर नाबाद 81

भारताने चौथ्या दिवशी 6 बाद 257 धावांवरुन डावाला सुरुवात केल्यानंतर 33 वर नाबाद असलेल्या वॉशिंग्टन सुंदरने डावात 85 धावांची जोरदार मजल मारली. यादरम्यान त्याने सातव्या गडय़ासाठी अश्विनसमवेत 80 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली आणि यामुळे भारताला पहिल्या डावात सर्वबाद 337 धावांपर्यंत पोहोचता आले. वॉशिंग्टन सुंदर यात 138 चेंडूत 85 धावांवर नाबाद राहिला. त्याने यात 12 चौकार, 2 षटकार फटकावले. तो एकूण 201 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडून उभा राहिला. त्या डावात ऋषभ पंतने सर्वाधिक 91 धावा फटकावल्या होत्या.

Related Stories

वनडे क्रिकेटबाबत चिंतेचे कारण नाही

Patil_p

शेवटच्या चेंडूवर चेन्नईचा विजय

Patil_p

द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेतून विराटला विश्रांती शक्य

Patil_p

वर्ल्डकप उपविजेत्या न्यूझीलंडचा ‘व्हाईटवॉश’!

Patil_p

शिवा थापा, दीपक पुढील फेरीत दाखल

Patil_p

दबंग दिल्ली, पुणे पलटन, तामिळ थलैवाज विजयी

Patil_p
error: Content is protected !!