Tarun Bharat

मिश्र सांघिक स्कीटमध्ये भारताला सुवर्ण

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आयएसएसएफ विश्व चषक नेमबाजी स्पर्धेच्या पाचव्या दिवशीही भारताला एक सुवर्ण मिळाले. गनेमत सेखाँ व अंगद वीर सिंग बजवा यांनी मिश्र सांघिक स्कीट नेमबाजीत हे सुवर्णयश मिळविले. 7 सुवर्णांसह भारताची एकूण 15 पदके झाली असून पदकक्त्यात ते पहिल्या स्थानावर कायम आहेत.

20 वर्षीय गनेमत व 25 वर्षीय अंगद या जोडीने पात्र फेरीत 141 गुण नेंदवत आघाडीचे स्थान घेतले होते आणि सुवर्णपदकाच्या लढतीतही त्यांनी हा जोम कायम राखत कझाकच्या ओल्गा पनारिना व अलेक्झांडर येचशेन्को या जोडीवर 33-29 अशा गुणांनी मात करीत सुवर्ण पटकावले. पदकतक्त्यात भारताने आघाडीचे स्थान कायम राखले असून सर्वाधिक 7 सुवर्णपदके भारताने मिळविली आहेत. याशिवाय 4 रौप्य व 4 कांस्यसह एकूण 15 पदके पटकावली आहेत. परिनाझ धालिवाल व मैराज अहमद खान या आणखी एका भारतीय जोडीचे कांस्यपदक मात्र अगदी थोडक्यात हुकले. कतारच्या रीम ए शरशानी व रशिद हमद यांनी 32-31 अशा गुणांनी भारतावर मात करीत कांस्यपदक मिळविले. भारतीय जोडीने शेवटच्या चार शॉट्समध्ये अचूक वेध घेतला. पण दडपणामुळे धालिवालचा एक शॉट चुकला आणि कांस्यपदकापासून त्यांना वंचित रहावे लागले.

जागतिक क्रमवारीत 62 व्या स्थानावर असणाऱया अंगदने परिपूर्ण प्रदर्शन करताना त्याचा 20 पैकी केवळ एक शॉट चुकला तर गनेमतचे 6 शॉट्स चुकले. दोन्ही जोडय़ांत जोरदार चुरस लागल्याने 20 शॉट्सच्या पहिल्या फेरीनंतर दोन्ही जोडय़ांनी 16-16 अशी बरोबरी साधली होती. दुसऱया फेरीत मात्र गनेमतने आपल्या कामगिरीत सुधारणा करीत पुढच्या चार शॉट्समध्ये अचूक वेध घेतला. अंगदचा एक शॉट चुकला तरी ओल्गा व अलेक्झांडर या दोघांचे प्रत्येकी 2 शॉट्स चुकल्याने भारताला 23-20 अशी आघाडी मिळाली. अंतिम चार शॉट्समध्ये अंगदने अचूक वेध घेतले तर गनेमतचा शेवटचा शॉट चुकला. मात्र कझाकच्या जोडीचे तीन शॉट्स चुकल्याने भारताचे जेतेपद निश्चित झाले.

या स्पर्धेत मिळविलेले गनेमतचे हे तिसरे पदक आहे. याआधी महिलांच्या सांघिक स्कीटमध्ये धालिवाल, कार्तिकी शक्तावत यांच्यासमवेत तिने रौप्य मिळविले आणि पहिल्या दिवशी महिलांच्या वैयक्तिक स्कीटमध्ये कांस्य मिळवित या स्पर्धेत स्कीटमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय नेमबाज होण्याचा मान मिळविला होता. अंगदचे हे दुसरे सुवर्णपदक असून याआधी गुरजोत खनगुरा, मैराज अहमद खानसमवेत त्याने पुरुषांच्या सांघिक स्कीटमध्येही सुवर्ण मिळविले आहे. या स्पर्धेत भारताच्या युवा नेमबाजांनी अप्रतिम प्रदर्शन केल्याचे दिसून आले आहे.

Related Stories

6 चेंडू…6 दिशा-उपदिशा अन् 6 षटकार!

Amit Kulkarni

विंडीज संघाच्या सराव शिबिराला प्रारंभ

Patil_p

थिसारा परेराचे षटकात 6 षटकार

Patil_p

पीसीबीच्या संचालकपदी पहिली महिला

Patil_p

मिशन चेन्नई! ‘ब्रिस्बेन’ची पुनरावृत्ती होणार का?

Patil_p

टी-20 मानांकनात भारत दुसऱया स्थानी

Patil_p
error: Content is protected !!