Tarun Bharat

मी आधी भारतीय, मग कर्नाटकी

ख्यातनाम लेखक भैरप्पा यांचे भाष्य : विरोधाचे मुद्दे केवळ राजकीय पातळीवर

 पुणे / प्रतिनिधी :

माझा जन्म कर्नाटकमध्ये झाला असला, तरी मी आधी भारतीय व नंतर कर्नाटकी आहे. मी कन्नड लेखक नसून भारतीय लेखक आहे, असे स्पष्ट मत ख्यातनाम साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी येथे व्यक्त केले. कन्नड लोक सांस्कृतिकदृष्टय़ा महाराष्ट्रावर प्रेमच करतात. विरोधाचे मुद्दे केवळ राजकीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले.

मेहता पब्लिशिंग हाऊसच्यावतीने ‘साक्षी’ आणि ‘उत्तरकांड’ या कादंबऱयांच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त भैरप्पा यांनी व्याख्यानातून समाजकारण, साहित्य, भाषा, भारतीयत्व, रामायण व महाभारत अशा अनेक विषयांवर मुक्त चिंतन घडवले. कादंबरीकार विश्वास पाटील, समीक्षक प्रा. रणधीर शिंदे, लेखिका व अनुवादिका उमा कुलकर्णी आणि सुनील मेहता उपस्थित होते.

मातृभाषा कन्नड असल्याने केवळ याच भाषेत लिहितो. पण माझ्या लिखाणाची संकल्पना नेहमी भारतीय असते. साहित्य आपल्या ह्रदयातील सत्य सांगते आणि ते केवळ मातृभाषेतून व्यक्त करता येते, असे सांगून ते म्हणाले, आपले सांस्कृतिक आणि संस्कृतीचे प्रश्न सारखेच आहेत. अशिक्षित लोक अधिक खुलेपणाने बोलतात. सुशिक्षित लोक आकडू असतात. खेडी मुक्तपणे बोलतात, तेव्हा मी लोकांना वाचतो. स्थानिक छटा थोडय़ाफार वेगळय़ा असल्या, तरी देशाच्या खेडय़ातील जीवन एकसारखे आहे. म्हणून भारत सांस्कृतिकदृष्टय़ा एकसंध आहे. लेखनकार्यासाठी मी शहरांपासून लांब जातो. तळागाळात फिरल्याशिवाय लिहीत नाही.

साहित्य संमेलनावरील बंदी व मराठी लेखकांच्या अडवडणुकीकडे भैरप्पा यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, मराठी लेखकांवर वा कलाकारांवर कन्नड लोक प्रेमच करतात. कर्नाटक पोलिसांनी मराठी लेखकांना अडवले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा अशा गोष्टी होतात. महाराष्ट्र पोलीसही हेच करतील. विरोधाचे प्रकार केवळ राजकीय पातळीवर घडतात. निवडणुका जवळ आल्या, की असे घडते. हे प्रकार कधीही थांबणारे नाहीत.

भैरप्पा म्हणजे मराठी-कन्नडमधील सेतू : उमा कुलकर्णी

कुलकर्णी म्हणाल्या, 55 व्या वषी लिहिलेली ‘साक्षी’ आणि 83 व्या वषी लिहिलेली ‘उत्तरकांड’ कादंबरी एकाचवेळी मराठी वाचकांसमोर आली आहे. भैरप्पांच्या वाङ्मयीन आकृतिबंधामध्ये, विचारप्रक्रियेत काही फरक झाला असेल, तर त्याचा समीक्षकांनी अभ्यास करावा. मराठी-कन्नड साहित्य संस्कृतिक सौहार्दाचा सेतू जोडण्याचे काम त्यांनी केले आहे.

भैरप्पांना महाराष्ट्रात कुणी अडवणार नाही

विश्वास पाटील म्हणाले, कर्नाटक सरकारने निपाणी साहित्य संमेलनावर बंदी घातली. पोलिसांनी शनिवारी मला अडवले. भैरप्पांना येथे असे कोणी अडवू शकत नाही. ते मराठी मनामध्ये सामावले आहेत. एका भाषेतून दुसऱया भाषेत पोहोचणाऱया थोडय़ाच लेखकांत ते आहेत. माणसांच्या रसरशीत कथा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़ आहे. अनेक कन्नड लेखकांना ज्ञानपीठ मिळाला; पण भैरप्पांना अजून मिळाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

स्वदेशी क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा ‘एडी-1’

Patil_p

लॅपटॉप, मोबाईलचा उपयोग करत सावित्रीबाईंना आदरांजली अर्पण

prashant_c

‘दगडूशेठ’ ला शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त 501 फळांचा नैवेद्य

Tousif Mujawar

जुन्या कार्पेटच करायचं काय?

Patil_p

माय मराठीचा दक्षिण दिग्विजय

tarunbharat

क्वारंटाईन रुग्णांसाठी ऑर्डिनन्स फॅक्टरीचा विशेष तंबू

prashant_c