मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. विधिमंडळात विविध विषयांवर चर्चा सुरु आहे. विरोधी पक्ष भाजपने 12 आमदारांच्या निलंबनाप्रकरणी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान आज अधिवेशनाचं कामकाम सुरु झाल्यानंतर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास प्रताप सरनाईक आपलं म्हणणं मांडण्यासाठी उभा राहिले. यावेळी माझ्यावर होणाऱ्या आरोपांनी सरकारची बदनामी होतेय. त्यामुळे गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार आहे पण केला नसेल तर क्लीनचिट देण्यात यावी अशी मागणी यावेळी सरनाईक यांनी केली.
विधानसभेत प्रताप सरनाईक म्हणाले की, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. माझ्यावर आरोप करून विनाकारण सरकारची बदनामी केली जाते. घोटाळा झालेला आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. MMRDA विभाग राज्य सरकारच्या अंतर्गत येतो. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने माझ्यावर आरोप करण्यात आले. याबाबत मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पत्र दिलं आहे असं त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून अहवाल मागवण्यात यावा. खरचं मी गुन्हा केला तर असेल तर प्रताप सरनाईक गजाआड जायला तयार आहे. मिळेल ती शिक्षा भोगायला तयार आहे.
पण घोटाळाच झाला नसेल आणि आर्थिक गुन्हे शाखेचा तपास पूर्ण झाला असेल तर मला राज्य सरकारकडून या प्रकरणात क्लीनचीट द्यावी. लवकरात लवकर हा अहवाल गृहमंत्र्यांनी सादर करावा. तो लोकांपर्यंत पोहचवावा. जेणेकरून लोकांसमोर सत्य समोर येईल असंही प्रताप सरनाईक म्हणाले.


previous post