मुंबई \ ऑनलाईन
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटी वसूलीच्या आरोप प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीने तपासासाठी समन्स बजावले आहेत. मात्र, अनिल देशमुख चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. त्यांनी वय, कोरोना आणि आजारपणाचं कारण पुढे करत व्हिडिओद्वारे जबाब घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी याबाबत एक पत्र लिहिलं आहे.
मंगळवारी ईडीला लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी लिहिले की, आजही मी स्वत: चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्षे आहे. आजारपण आणि करोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाइन घ्यावा. ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यास मी कधीही तयार आहे. मात्र, त्याआधी ईडीनं ईसीआर व प्रश्नांची कॉपी पाठवावी,’ असं देशमुख यांनी पत्रात म्हटलं आहे. माझ्या वतीनं ईडीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी अधिकृत प्रतिनिधी नेमला आहे,’ असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ‘माझ्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत,’ याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.
आतापर्यंत दोन वेळा ईडीनं देशमुख यांच्या घरी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली आहे. दुसरा छापा मागील आठवड्यात टाकण्यात आला होता. त्यानंतर देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना अटकही करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर काही महत्त्वाची माहिती ईडीच्या हाती आली आहे. त्या आधारे ईडीनं आतापर्यंत अनिल देशमुख यांना चौकशीसाठी दोन वेळा समन्स बजावलं आहे. पहिल्या समन्सच्या वेळी देशमुख यांनी वकिलांना पाठवून मुदत मागून घेतली. त्यानंतर ईडीनं दुसरं समन्स बजावत देशमुख यांना (२९ जून) आज चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहता येणार नसल्याचं म्हटलं आहे.

