Tarun Bharat

मुंबईकरांचा ‘आशीर्वाद’, आरसीबी प्ले-ऑफमध्ये!

आयपीएल साखळी सामन्यात मुंबईचा 5 गडी राखून विजय,

मुंबई / वृत्तसंस्था

Advertisements

कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय संपादन करावा, यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरची प्रार्थना शनिवारी आयपीएल साखळी सामन्यात फळली आणि मुंबई इंडियन्सने दिल्लीचे आव्हान संपुष्टात आणल्यानंतर आरसीबीचे प्ले-ऑफमधील स्थान सुनिश्चित झाले! अनेक चढउतारात रंगलेल्या या लढतीत दिल्लीला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 20 षटकात 7 बाद 159 धावा जमवता आल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 19.1 षटकात 5 बाद 160 धावांसह सहज विजय संपादन केला.

विजयासाठी 160 धावांचे आव्हान असताना कर्णधार रोहित शर्मा (2) स्वस्तात बाद झाला तरी इशान किशन (35 चेंडूत 48), डेव्हॉल्ड ब्रेविस (37) यांनी दुसऱया गडय़ासाठी 51 धावांची भागीदारी साकारली आणि इथे मुंबईच्या विजयाचा भक्कम पाया रचला गेला. त्यानंतर तिलक वर्मा (21), टीम डेव्हिड (11 चेंडूत 34) यांनी संघाला विजयाच्या उंबरठय़ावर आणले. रमणदीप (6 चेंडूत नाबाद 13), सॅम्स (नाबाद 0) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

जसप्रित बुमराहचे 3 बळी

प्रारंभी, जसप्रित बुमराहने 3 बळी घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकात 7 बाद 159 धावांवर रोखण्याचा पराक्रम गाजवला. रोव्हमन पॉवेलने 34 चेंडूत 43 धावा केल्या असल्या तरी तो दिल्लीला आव्हानात्मक धावसंख्या उभी करुन देऊ शकला नाही.

नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणाऱया मुंबई इंडियन्सतर्फे त्यांच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांवर प्रारंभापासूनच अंकुश ठेवला. जसप्रित बुमराहने लागोपाठ बळी घेतल्यानंतर दिल्लीची एकवेळ 8.4 षटकात 4 बाद 50 अशी पडझड झाली होती. पण, नंतर पॉवेल व कर्णधार रिषभ पंत (33 चेंडूत 39) यांनी 44 चेंडूत 75 धावांची भागीदारी साकारत संघाला समाधानकारक धावसंख्येच्या उंबरठय़ावर आणले.

डॅनिएल सॅम्स (1-30), रिले मेरेडिथ (2 षटकात 0-9) यांनी काटेकोर मारा केला तर मयांक मार्कंडे (1-26), ऋतिक शोकिन (0-34) यांनी समयोचित साथ दिली. रमणदीप सिंगनेही 29 धावात 2 बळी घेतले. टायफाईडवर मात करुन मैदानात उतरलेल्या पृथ्वी शॉने मिडविकेटकडे चौकार व लाँगऑफकडे षटकार खेचत उत्तम सुरुवात केली. मात्र, सॅम्सने वॉर्नरला शॉर्ट थर्डमॅनवरील बुमराहकरवी झेलबाद करत पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. बुमराहने नंतर मिशेल मार्शला तंबूचा रस्ता दाखवला. रोहित शर्माने अप्रतिम एकहाती झेल टिपला. त्यानंतर बुमराहने खेळताच येणार नाही, अशा बाऊन्सरवर शॉची खेळी संपुष्टात आणली.

त्यानंतर मार्कंडेने सर्फराजला बाद केले आणि दिल्लीची 9 व्या षटकात 4 बाद 50 अशी स्थिती झाली. शोकिन व मार्कंडे उत्तम बहरात गोलंदाजी करत असताना दिल्लीला 10 षटकात 4 बाद 50 अशी किरकोळ मजल मारता आली होती. पंतने जीवदान दिल्यानंतर पॉवेलने शोकिनच्या एकाच षटकात 2 षटकार व एका चौकारासह एकूण 20 धावा वसूल केल्या.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल्स ः 20 षटकात 7 बाद 159 (रोव्हमन पॉवेल 34 चेंडूत 1 चौकार, 4 षटकारांसह 43, रिषभ पंत 33 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 39, पृथ्वी शॉ 23 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 24, अक्षर पटेल 10 चेंडूत नाबाद 19. अवांतर 14. जसप्रित बुमराह 4 षटकात 3-25, रमणदीप सिंग 2-29, डॅनिएल सॅम्स 1-30, मयांक मार्कंडे 1-26).

मुंबई इंडियन्स ः 19.1 षटकात 5 बाद 160 (इशान किशन 35 चेंडूत 48, डेव्हॉल्ड ब्रेविस 33 चेंडूत 37, तिलक वर्मा 21, टीम डेव्हिड 11 चेंडूत 34, रमणदीप नाबाद 13. अवांतर 5. नोर्त्झे, शार्दुल प्रत्येकी 2 बळी, कुलदीप यादव 1-33).

Related Stories

1500 मी.इनडोअर शर्यतीत गुडाफ त्सेगेचा नवा विश्वविक्रम

Patil_p

इंग्लंडच्या विजयात रूटचे नाबाद शतक

Patil_p

ओपेल्काचा मेदवेदेवला धक्का, शॅपोव्हॅलोव्हची आगेकूच

Patil_p

लंकेचा भानुका राजपक्षे निवृत्त

Patil_p

टोकियो ऑलिंपिकमध्ये बजरंगला कांस्यपदक

Patil_p

मुंबई-मध्यप्रदेश रणजी फायनल आजपासून

Patil_p
error: Content is protected !!