ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई आणि उपनगरांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच या सुरू असणाऱ्या पावसाने बुधवारी रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतो आहे. याच पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.


या पावसाचा जोर इतका आहे की उंबरमाळी रेल्वे स्थानकामध्ये ट्रॅकवर नाही थेट प्लॅटफॉर्मच्या उंचीपर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळेच मध्य रेल्वेने रात्रीपासून या रेल्वे स्थानकातून होणारी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.


याबाबत माहिती देताना मध्य रेल्वेच्या प्रमुख्य प्रवक्त्यांनी सांगितले की, उंबरमाळी रेल्वे स्थानक आणि कसारा दरम्यानची वाहतुकीला पावसाचा फटका बसला आहे. इगतपुरी आणि खर्डीदरम्यानची रेल्वे वाहतूक सुद्धा रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने थांबवण्यात आली आहे.


रात्रभर पडलेल्या पावसामुळे भिवंडीमध्येही मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर कंबरेच्या उंची इतके पाणी साचले आहे.
- मुंबईला रेड अलर्ट
हवामान खात्याने मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज आहे. आधी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र पावसाचे एकंदरीत रूप लक्षात घेता नंतर रेड अलर्ट देण्यात आला आहे.