ऑनलाईन टीम / मुंबई :
तळ कोकणाला झोडपून काढल्यानंतर आता मुंबईमध्ये गुरुवार रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले असून याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे. या सोबतच पुढील 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी अतितीव्र पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


दरम्यान, काल पासून सुरू झालेल्या पावसामुळे वडाळ्यामध्येही काही ठिकाणी पाणी साचले आहे. तर सकाळपासूनच रेल्वेच्या वाहतुकीची गती मंदावल्याचे चित्र पहायला मिळाले.


कुर्ला- विद्याविहारदरम्यान ट्रॅक्सवर पाणी साचल्याने वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशीराने होत आहे. कुर्ला-विद्याविहारदरम्यानची स्लो मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आलीय. हार्बर मार्गावरील वाहतूकही 20 ते 25 मिनिटे उशीराने होत आहे. मात्र मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हार्बर मार्गावरील वाहतूक उशीराने असली तरी सुरळीत सुरु असल्याचे सांगितले जात आहे.