ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच मुंबईत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज 3 हजारच्या टप्प्यात रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने आता काही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.


या अंतर्गत येत्या रविवारी असणारा होळीचा उत्सव, तसेच त्यानंतर असणारा धुलिवंदन हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक अशा कोणत्याच ठिकाणी साजरा करण्यास मुंबई महानगर पालिकेकडून मनाई करण्यात आली आहे. या संदर्भातील परिपत्रक पालिकेकडून जारी करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच, नियम मोडणाऱ्यांवर साथरोग कायदा 1897 आपत्ती निवारण कायदा 2005 आणि भादंवि 1860 नुसार कारवाई केली जाईल, असे देखील नमूद करण्यात आले आहे.


दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार आज मुंबईत 3,512 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 8 जणांनी आपला जीव गमावला आहे. तसेच आजच्या दिवशी 1203 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे रुग्णांचा एकूण आकडा 3,36,426 वर पोहोचला आहे. तर आता पर्यंत 3,29,234 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत 27,672 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 11,600 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.