प्रतिनिधी/इस्लामपूर
‘ते’ कोल्हापूर जिल्ह्यातील बाराजण विनापरवाना मुंबईहून गावच्या ओढीने आले. पण कोल्हापूर प्रशासनाने त्यांना स्वीकारले नाही. पुन्हा सांगली आणि सातारा जिल्हा हद्दीवर असणाऱ्या मालखेड चेकपोस्ट येथे आणून सोडले. या हद्दीच्या वादात त्यांचे शुक्रवार पासून उघड्यावर हाल सुरु आहेत. अखेर त्यांना संस्था क्वारंटाईन करण्याच्या हालचाली वाळवा तालुका प्रशासनात सुरु आहेत.
हे सर्वजण कागल येथील आहेत. एका जीपचालकाने कमाई करण्यासाठी त्यांना आपल्याकडे पास असल्याचे सांगून आणले. मालखेड चेकपोस्ट येथे अडवल्यानंतर त्यांना सोडून जीपवाला पळाला. आणि सुरु झाले,त्यांचे हाल. दोन कुटुंबातील हे लोक खुसकीच्या मार्गाने कागलकडे जाण्यासाठी निघाले. पण कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने त्यांना रोखून प्रवेश नाकारला. तसेच मालखेड येथे आणून सोडले. हे सर्व थांबून आहेत. त्यांच्या पोटाचे हाल सुरु आहेत.’ना घर का,ना घाट का’अशी त्यांची अवस्था आहे.
अखेर वाळवा तालुका प्रशासनात या लोकांबाबत विचार सुरु झाला असल्याचे समजते. त्यांना परवानगीचा तिढा सुटेपर्यंत इस्लामपूर किंवा इतरत्र क्वारंटाईन करण्याचा विचार असल्याचे प्रशासनातील एक जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले. या कोरोना काळात हद्द वाद उफाळत असल्याचे या निमित्ताने पुढे आले आहे.


previous post
next post