Tarun Bharat

मुंबई इंडियन्स की दिल्ली कॅपिटल्स?

Advertisements

उभय संघात जेतेपदासाठी तुंबळ रस्सीखेच अपेक्षित

दुबई / वृत्तसंस्था

तब्बल 52 दिवसांपासून दिवाणखान्यात ऐटीत विराजमान होत आलेल्या आयपीएल स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला आता उंबरठय़ावर येऊन ठेपला असून आज (दि. 10) मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ जेतेपदासाठी एकमेकांविरोधात दंड थोपटणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता या निर्णायक लढतीला सुरुवात होईल.

यंदा कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे आयपीएल स्पर्धा भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीत स्थलांतरित करण्यात आली. स्पर्धेत प्रेक्षकांना प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे, टीव्हीवरुन होणारे थेट प्रसारण हे एकच माध्यम उपलब्ध होते. बीसीसीआयने ताकद पणाला लावत स्पर्धा यशस्वी करुन देण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आणि यामुळे नकारात्मक वातावरणावर काही प्रमाणात मार्ग शोधता आला. त्यानंतर आता निर्णायक मोक्याच्या घडीला आयपीएल चषक रोहित शर्मा उंचावणार की श्रेयस अय्यर हे आज स्पष्ट होईल.

साधारणपणे डझनभर आयपीएल हंगाम खेळणाऱया दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदा प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे त्यांना जेतेपद खुणावत असणे साहजिक आहे. दुसरीकडे, वादळाच्या केंद्रस्थानी राहिलेला रोहित शर्मा स्वतःला सिद्ध करण्याची एकही संधी सोडणार नाही, हे तितकेच स्पष्ट असेल.

रोहितचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार

यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्ससारखा अन्य दुसरा कोणताही संघ समतोल राहिलेला नाही, याचा सर्वच प्रँचायझींना हेवा राहिलेला आहे. रोहित धोंडशिरेच्या दुखापतीने त्रस्त असताना क्विन्टॉन डी कॉकने ताकदीने त्याची जागा भरुन काढली. आजच्या लढतीत रोहित शर्माची तंदुरुस्ती, त्याचा फॉर्म मुंबईसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

सुर्यकुमार यादव 60 चौकार व 10 षटकारांसह सातत्याने तळपत राहिला असून आरसीबीविरुद्ध साखळी सामन्यात विराटच्या नजरेला नजर भिडवण्याची धमक त्याने दाखवली. शिवाय, त्या विजयात मोलाचा वाटाही उचलला होता. इशान किशनने 29 षटकारांची आतषबाजी केली तर केरॉन पोलार्डने 190 पेक्षा अधिक स्ट्राईकरेट नोंदवला आहे.

मुंबई इंडियन्सच्या बलाढय़ फलंदाजी लाईनअपला सुरुंग लावायचा असेल तर कॅगिसो रबाडा (29 बळी) व नोर्त्जे (20 बळी) यांच्यावरच दिल्लीची मुख्य भिस्त असणार आहे. त्यानंतरही कृणाल व हार्दिक या पंडय़ा बंधूंचे आव्हान दिल्लीसमोर असेल.

यंदाचा मोसम धवनसाठी सर्वोत्तम

शिखर धवनसाठी यंदाचा मोसम सर्वोत्तम राहिला असून त्याने आतापर्यंत 603 धावांची आतषबाजी केली आहे. आजच्या अंतिम लढतीत धवनसमोर बुमराह व बोल्टच्या यॉर्करचा बीमोड करण्याचे आव्हान असेल. मुंबई-दिल्ली यांच्यात या हंगामात 3 लढती झाल्या असून तिन्ही वेळा मुंबईनेच बाजी मारली आहे. पण, आता चौथ्या लढतीत आपण सुदैवी ठरु, अशी आशा दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरची असणार आहे. मार्कस स्टोईनिसने अष्टपैलू खेळ साकारताना 352 धावा व 12 बळी अशी कामगिरी नोंदवली.

संभाव्य संघ

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रित बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मिशेल मॅकक्लॅघन, मोहसीन खान, नॅथन कोल्टर-नाईल, प्रिन्स बलवंत राय, क्विन्टॉन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सुर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), कॅगिसो रबाडा, मार्कस स्टोईनिस, संदीप लमिचने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेतमेयर, ऍलेक्स कॅरे, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, अमित मिश्रा, ऍनरिच नोर्त्जे, डॅनिएल सॅम्स.

सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

मुंबई इंडियन्ससमोर आव्हान त्या दोन मुंबईकरांचे!

विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सचे आजच्या लढतीतील प्रतिस्पर्धी दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व मुंबईकर युवा फलंदाज श्रेयस अय्यरकडे असून याच दिल्ली संघात आणखी एक मुंबईकर आहे, तो म्हणजे अजिंक्य रहाणे! साहजिकच, मुंबई इंडियन्सला दिल्लीविरुद्ध लढताना या दोन ‘घर’च्या खेळाडूंचा बीमोड देखील करावा लागणार आहे.

अश्विनची जादू आजही चालणार का?

दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीची संधी मिळाल्यानंतर यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्ध रोहित शर्माला पहिल्याच षटकात बाद करण्याचा पराक्रम साधला होता. तोच कित्ता आजच्या लढतीतही अश्विन गिरवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अश्विनला अपेक्षित सूर सापडला तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ देखील चमत्कार घडवण्याची ताकद राखून आहे.

2017 नंतर ‘तो’ खेळाडू प्रथमच फायनलमधून बाहेर!

चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार व जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक असणारा महेंद्रसिंग धोनी 2017 ते 2019 अशा सलग तीन हंगामात आयपीएल फायनल खेळला आहे. यंदा मात्र चेन्नईचे आव्हान प्ले-ऑफपूर्वीच संपुष्टात आले असून यामुळे 2017 नंतर प्रथमच धोनी आयपीएल फायनलमध्ये खेळताना दिसून येणार नाही.

या हंगामातील आतापर्यंतची कामगिरी

संघ / सामने / विजय / पराभव / खेचलेले षटकार

मुंबई इंडियन्स / 15 / 10 / 5 / 130

दिल्ली कॅपिटल्स / 16 / 9 / 7 / 84

Related Stories

ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम फेब्रुवारीत?

Omkar B

नितीश राणाला दंड, बुमराहला समज

Amit Kulkarni

विश्व ट्रायथ्लॉन चॅम्पियनशिप रद्द

Patil_p

पुजाराची लिस्ट ए मधील सर्वोच्च कामगिरी

Patil_p

सौरभ, इलावेनिलची दमदार सुरूवात

Patil_p

सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारताचे आठवे अजिंक्यपद

Patil_p
error: Content is protected !!