Tarun Bharat

मुंबई इंडियन्स-सनरायजर्स हैदराबाद लढत आज

Advertisements

भुवनेश्वरच्या खेळण्याबाबत साशंकता, पॉवरहिटिंग पहावयास मिळण्याची अपेक्षा

वृत्तसंस्था/ शारजा

स्फोटक फलंदाजीची लाईनअप आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांकडून त्यांना मिळणारी पूरक साथ यामुळे रविवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱया आयपीएलमधील दुपारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे पारडे जड असणार आहे. दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी असल्याने तो या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सनरायजर्सच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात भुवनेश्वरला दुखापत झाल्याने आपले शेवटचे षटकही तो पूर्ण करू शकला नव्हता. संघाच्या फिजिओच्या आधाराने त्याला मैदान सोडावे लागले होते. तो या सामन्यात खेळू न शकल्यास मुंबई इंडियन्स शारजा क्रिकेट मैदान हे दुबई व अबु धाबीपेक्षा लहान असल्याने, त्याचा लाभ उठवण्याची शक्यता आहे. शारजा मैदान हे पॉवरहिटिंग करणाऱया फलंदाजांसाठी नंदनवन ठरत आले आहे.

विद्यमान विजेत्या मुंबईने आधीच्या सामन्यात बलाढय़ किंग्स इलेव्हन पंजाबचा धुव्वा उडविला होता. तो विजयी संघच रविवारच्या सामन्यात ते कायम ठेवण्याची जास्त शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये असून लय सापडल्यास कोणत्याही गोलंदाजीच्या तो चिंधडय़ा उडवू शकतो. या मोसमात त्याने चार सामन्यात 170 धावा जमविल्या आहेत. क्विन्टॉन डी कॉकचा खराब फॉर्म हा मात्र त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. सूर्यकुमार यादवनेही चांगली फलंदाजी केली आहे. मात्र त्याला मोठी खेळी करण्यावर जोर द्यावा लागेल. मुंबईसाठी सर्वात दिलासा देणारी बाब म्हणजे मध्यफळीतील फलंदाजांना गवसलेला सूर. इशान किशन, हार्दिक पंडय़ा व पोलार्ड तिघांनीही प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजांवर जबरदस्त हल्ला केला आहे. मुंबईसाठी ‘फाईंड’ ठरलेल्या इशान किशनने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात जलद तरीही जबाबदारीने फलंदाजी केली होती. हार्दिक व पोलार्डची फटकेबाजी सनरायजर्सच्या गोलंदाजांची चिंता वाढवणारी ठरू शकते. मुंबई संघ गोलंदाजीत कोणताही बदल करण्याची शक्यता वाटत नाही. कारण राहुल चहर व कृणाल पंडय़ा या फिरकी गोलंदाजांनीही आपली भूमिका चोख पार पाडली आहे. सनरायजर्सच्या फलंदाजांवरही अंकुश ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

सनरायजर्सला दिलासा देणारी बाब म्हणजे त्यांच्या युवा खेळाडूंनी केलेली कामगिरी. चेन्नईविरुद्ध त्यांनी 7 धावांनी विजय मिळविला. त्या सामन्यात बडे खेळाडू अपयशी ठरल्यावर युवा खेळाडूंनीच हा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. सनरायजर्सचा कर्णधार वॉर्नर, बेअरस्टो, मनीष पांडे या सामन्यात तरी मोठी खेळी करतील, अशी व्यवस्थापनाची अपेक्षा आहे. विल्यम्सनचे संघातील स्थान निश्चित असून तो एक बाजू लावून धरू शकतो. त्यांच्या सिनियर खेळाडूंनी चमक दाखविल्यास युवा खेळाडूंवरील दबाव बराचसा कमी होणार आहे. मात्र भुवनेश्वरच्या गैरहजेरीत यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनवर दबाव येण्याची शक्यता आहे.

संघ : मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, पॅटिन्सन, बुमराह, जयंत यादव, पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मॅक्लेनाघन, मोहसिन खान, कोल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, डॉ कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, बोल्ट.

सनरायजर्स हैदराबाद : वॉर्नर (कर्णधार), बेअरस्टो, विल्यम्सन, पांडे, गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, साहा, अब्दुल समद, विजय शंकर, नबी, रशिद खान, होल्डर, अभिषेक शर्मा, बी.संदीप, संजय यादव, फॅबियन ऍलेन, भुवनेश्वर, खलील अहमद, संदीप शर्मा, नदीम, कौल, स्टॅन्लेक, टी. नटराजन, थम्पी.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.

Related Stories

सचिन तेंडुलकर जगातील तिसऱया क्रमांकाचा प्रशंसनीय क्रीडापटू

Patil_p

आज फातोडर्य़ात होणार एफसी गोवा आणि मुंबई सिटीत स्फोटक लढत

Patil_p

जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड कौंटीसाठी उपलब्ध

Patil_p

सांगलीच्या श्रेयस पुरोहितची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमी नोंद

Archana Banage

केन विल्यम्सनचे 24 वे कसोटी शतक

Patil_p

विराट, डीव्हिलियर्स आरसीबी संघात दाखल

Amit Kulkarni
error: Content is protected !!