Tarun Bharat

मुंबई-पंजाब आज आमनेसामने, फलंदाजांची जुगलबंदी अपेक्षित

Advertisements

वृत्तसंस्था / अबु धाबी

आधीच्या सामन्यात अगदी थोडक्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या मुंबई इंडियन्स व किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात गुरुवारी आयपीएलमधील साखळी सामना होणार असून दोन्ही संघ पुन्हा विजयपथावर येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याने त्यांची खरी कसोटी लागणार आहे. 7.30 पासून या सामन्याला सुरुवात होईल.

गेल्या रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 224 या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केल्याने किंग्स इलेव्हन पंजाबला हार पत्करावी लागली होती. मुंबई इंडियन्सलाही 202 धावांचा पाठलाग करताना पोलार्ड व इशान किशन यांनी झुंजार फलंदाजी करीत सामना टाय केला होता. पण दुर्दैवाने सुपरओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्सकडून मुंबईला पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमविल्यानंतर केकेआरचा पराभव करीत पुन्हा मुसंडी मारली होती. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघाला कोहलीच्या आरसीबीवर विजय मिळविता आला नाही. याचप्रमाणे किंग्स इलेव्हन पंजाबने पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत झाल्यानंतर दुसऱया सामन्यात आरसीबीला नमवित गुणांचे खाते खोलले होते. मात्र तिसऱया सामन्यात जबरदस्त फलंदाजी करूनही त्यांना पराभूत व्हावे लागले होते.

पंजाब संघाला मोक्याच्या वेळी पकड मिळविण्यात अपयश आल्याचे दिसून आले. पराभूत झालेल्या दोन्ही सामन्यात त्यांची स्थिती भक्कम असूनही त्यांना संधींचा लाभ उठवता आला नाही. त्यांचे गोलंदाज मोठी धावसंख्या असूनही त्याचे रक्षण करू शकले नाहीत. राहुल तेवातियाने तर जलद गोलंदाज कॉट्रेलला एका षटकात पाच षटकार ठोकून राजस्थानचा विजय सोपा केला होता. त्या हल्ल्यापूर्वी पंजाबच्या मोहम्मद शमीने चांगली गोलंदाजी केली होती. पण त्यालाही नंतर झोडपले गेले. लेगस्पिनर रवि बिश्नोईचा किफायतशीर मारा वगळता पंजाबचा अन्य एकही गोलंदाज राजस्थानविरुद्ध चमक दाखवू शकला नाही.

कर्णधार राहुल व मयांक अगरवाल यांनी या मोसमात आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देताना दोघांनीही एक शतक व अर्धशतक नोंदवले आहे. या जोडीला लवकर बाद करणे हेच मुंबईचे पहिले उद्दिष्ट असेल.

राजस्थानविरुद्ध या जोडीने 183 धावांची सलामी दिली होती. त्यात अगरवालने पहिले शतक नोंदवले तर राहुलने 54 चेंडूत 69 धावा फटकावल्या होत्या.

मुंबई इंडियन्सकडे फलंदाजांचा उत्तम ताफा असून रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन या आघाडी फळीतील फलंदाजांनंतर पोलार्ड व हार्दिक पंडय़ा हे मोठे फटके मारणारे फलंदाज मध्यफळीत आहेत. जलद गोलंदाज जसप्रित बुमराहचा खराब फॉर्म हा मात्र त्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनला आहे. तीन सामन्यात त्याला केवळ 3 बळी टिपता आले आहेत. त्याच्याकडून जी अपेक्षा केली जाते, तशी ती होत नसल्याचे दिसून आले आहे. या मैदानावर मुंबईने एक सामना खेळला असल्याने या सामन्यात मानसिकदृष्टय़ा त्यांची बाजू थोडीशी वरचढ असणार आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल (कर्णधार), अगरवाल, कॉट्रेल, गेल, मॅक्सवेल, शमी, मुजीब उल रहमान, करुण नायर, नीशम, निकोलस पूरन, इशान पोरेल, अर्शदीप सिंग, मुरुगन अश्विन, के.गौतम, हरप्रीत ब्रार, दीपक हुडा, जॉर्डन, सर्फराज खान, मनदीप सिंग, दर्शन नलकंडे, रवि बिश्नोई, सिमरन सिंग, जगदीशा सुचित, तजिंदर सिंग, हार्डस व्हिलोएन.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, पॅटिन्सन, बुमराह, जयंत यादव, पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मॅक्लेनाघन, मोहसिन खान, कोल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, क्विन्टॉन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, बोल्ट.

Related Stories

डेव्हिस संघात भांब्रीचे पुनरागमन, नागलला डच्चू

Amit Kulkarni

देवी परिवारातर्फे बालाजी ट्रस्टला 11 हजारांची देणगी

Patil_p

आयपीएलमधील कॅरेबियन खेळाडू मायदेशी परतले

Patil_p

अहो आश्चर्यम! द्रविडचा रुद्रावतार…तो ही थेट रस्त्यावर!

Patil_p

सेरेना, पिरोन्कोव्हा चौथ्या फेरीत

Patil_p

महिला टी-20 चॅलेंजसाठी संघ, कर्णधार घोषित

Patil_p
error: Content is protected !!