Tarun Bharat

मुक्त स्वानंदातच रमलेला असतो

अध्याय अकरावा

मुक्त हा लौकिकामध्ये जड, मूक, पिशाच्चासारखाच वागत असतो. म्हणजे एखाद्या निर्जीव वस्तूसारखा एकाच जागी पडून असतो. अनावश्यक बोलणे तो टाळत असतो तसं बघायला गेलं तर माणसाचं दिवभरातलं बरंचसं बोलणं अनावश्यकच असतं. एकतर मनुष्य दुसऱयाची निंदा करण्यासाठी तोंड उघडतो किंवा काही स्वार्थ साधण्यासाठी दुसऱयाची स्तुती करत असतो अन्यथा मी किती शहाणा आहे हे सांगत असतो. मुक्ताच्या हे बरोबर लक्षात आलेलं असतं आणि त्याला यातलं काहीच करायचं नसल्याने बहुतांश काळ तो मुकच असतो. म्हणून नाथमहाराज त्याला जड, मूक पिशाच्च असं म्हणतात.

असं असलं तरी मौनाचा अभिमान धरण्याचाही त्याचा हेतु नसतो. जेव्हा तो कुठलंही कर्म करतो त्यामागे कोणताही हेतू नसतो. मग ते कर्म कायिक, वाचिक किंवा मानसिक कोणतेही असो. त्याच्याकडून होणारे कर्म सहजगत्या होत असते. सामान्य मनुष्य जेव्हा एखादं कर्म करत असतो तेव्हा त्याच्या मनात त्यातून काहीतरी मिळवण्याचा हेतू असतो पण मुक्तपुरुषाच्या दृष्टीने हे साध्य होणारे हेतु अशाश्वत असतात म्हणून तो अहेतुकपणे कर्म करत असतो. मनातल्या अशा अशाश्वत गोष्टी काढून टाकून तो परब्रह्माचे चिंतन करू लागला की, त्याचे सद्गुरु समोर उभे ठाकतात. मग काय ? ध्येय, ध्याता, ध्यान हे सर्व उडून जाऊन भेदाचे भानच नाहीसे होते आणि जिकडे तिकडे चैतन्य भरून राहते. ज्याचं चित्त चैतन्यात हरपलं आहे तो लोकांमध्ये जड-मूक-पिशाचासारखा वागताना दिसतो. हे तो सर्व मुद्दामहून करत असतो. कारण तो मुक्तपुरुष आहे हे त्याला लौकिकात जाणवून द्यायचं नसतं आणि दुसरं म्हणजे नैष्कर्म्य ब्रह्माची त्याला दृढ प्राप्ती झालेली असते. परंतु त्याला प्राप्त झालेलं ब्रह्म हे कोणाला बोलून दाखविता येत नाही म्हणून तो खाणाखुणा करून दाखवत असतो. तसेच कुणाशी त्याला अमुक एक असे काहीच बोलायचे नसते म्हणून तो मूक असतो. उद्धवा ! त्याच्या मनात द्रव्याचा लोभ कधीच नसतो. म्हणून तो द्रव्याला कधी शिवत नाही. ह्याकरितांच लोक त्याला पिशाच्च असं म्हणतात. त्याच्या पिसेपणाचा मोठा चमत्कार असतो. इतर जे करू शकत नाहीत तो ते सहजी करू शकतो. जगाला जे माहीतसुद्धा नसते, त्या ब्रह्मरसाचे तो पान करतो आणि जे भक्षण करता येत नाही, त्या अभक्ष्याचे तो भक्षण करतो. जगाला जेथे जाता येत नाही, त्या अगम्य ठिकाणी हा गमन करतो. जगाचे जेथे मनसुद्धा शिरू शकत नाही, तेथे सर्वांगासहवर्तमान हा घुसतो. विधिनिषेधाचा भागच तो मनात आणत नाही. कर्माकर्माचा खटाटोप तो करीत नाही. सारे अंग स्वानंदानेच खेळवीत असतो. म्हणूनच जग त्याला पिसा किंवा वेडा म्हणते. अशा प्रकारे मुक्ताच्या अंगी जडाची, मुक्मयाची व पिशाच्चाची लक्षणे मिथ्या किंवा वरकरणी नसतात, तर खरोखरीच असतात. व्यर्थ कचकच करणे त्याला आवडत नाही. तसेच ही एक गोष्ट लक्षात ठेव की, मुक्ताच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा आग्रह म्हणून नसतो. जो अतिशय आग्रही असतो तो खरोखर बद्ध होय. ही जी मुक्तांची लक्षणे सांगितली तीच साधकांची साधने असतात. सिद्धाला ती सहजगत्या प्राप्त असतात, आणि साधकाला ती दृढतर निष्टेने साध्य करून घ्यावी लागतात. ही जी लक्षणे सांगितली, त्यांचा भोक्ता एक सिद्धच असतो. तसेच ही साधने ज्याला साध्य करावयाला येतात, तो साधकही ह्याचा लाभ घेणारा असतो.

विशेष म्हणजे जे, स्वतः शास्त्रज्ञ व पंडित म्हणून अभिमान मिरविणारे असतात त्यांना, सज्जन दुर्बुद्धीला दूर सारतात त्याप्रमाणे, मुक्तांच्या पंक्तीतून दूर लोटलेले असते. जो  साधन न साधता कोरडाच शास्त्राचा अभिमान बाळगतो, आणि रात्रंदिवस धनाची व मानाची इच्छा करतो, तो आत्मज्ञानापासून अलिप्त राहतो ! आम्ही मोठे कर्मकुशल याज्ञिक आहोत, शास्त्रसंपन्न व वेदपाठक आहोत असे म्हणतात किंवा निरंतर जे द्रव्याच्या इच्छेने लोलुप झालेले असतात, त्यांनाही हे सुख प्राप्त होणे नाही.

क्रमशः

Related Stories

मौजे आटपाट नगर

Patil_p

आरक्षणाचा खेळ झालाच!

Patil_p

दिलासादायक जून!

Amit Kulkarni

जुन्या वाहनांची नोंदणी आठ पटीने महागणार

Patil_p

कोरोनानंतरचे बदलते काम आणि कामगिरी!

Patil_p

जो प्राणीमात्रांचे हित करतो त्याचे श्रीकृष्ण सदासर्वदा कल्याण करतो

Patil_p