ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे एक महत्वपूर्ण मागणी केली आहे. कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून, आता या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचविणे आवश्यक आहे, त्यामुळे 25 वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोना परिस्थितीची माहिती मांडलेली आहे. याशिवाय चाचण्यांचा वेग देखील वाढण्यात आलेला आहे. प्रत्येक कोरोनाबाधित बरा झाला पाहिजे या हेतूने आम्ही उपाययोजना करत आहोत. मागील वर्षीच्या तुलनेत अधिक घातक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ‘ब्रेक द चेन’ या मोहीमेद्वारे काही कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु, जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहणार आहे. याशिवाय आरोग्याचे सर्व नियम सर्वजण पाळतील अशी कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे.
याचसोबत मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितले आहे की, लसीकरण वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे परंतु त्यासाठी केंद्र सरकारने अधिक डोसचा देखील पुरवठा करावा. मंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या सर्वाधिक रूग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांसाठी केवळ तीन आठवड्यात 45 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची आमची तयारी असून, यासाठी दीड कोटी डोस मिळावेत, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी पत्राद्वारे केली आहे.