ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात त्यांनी कोरोनाचा लसीचा पहिला डोस घेतला. देशभरात गेल्या 1 मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतली.


अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मी कोरोना लस घेणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाची लस घेतली. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दाखल झाले. त्यानंतर त्यांची प्राथमिक तपासणी केली गेली. यानंतर त्यांना लस देण्यात आली. ही लस देण्यात आल्यानंतर त्यांना अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी कोरोनाची लस घेतली. यांनीही जे. जे. रुग्णालयात लस घेतली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोरोना लस घेतली. कोरोना लसीबाबत भीती किंवा संभ्रम ठेवण्याचे कारण नाही. लस घेताना कळत सुद्धा नाही. कोरोनाचा धोका परत वाढतो आहे. त्यामुळे जे कोणी कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी लस घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी केले.
कदाचित काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. लसीकरण करुन घ्या. बाहेरचे अनावश्यक जाणे टाळा. आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. नाईलाजाने परत कडक लॉकडाऊन करावा लागेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.