बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना बुधवारी दिल्लीहून रिकाम्या हाताने परतावे लागले कारण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांना मंत्रिमंडळ विस्तारास आणि फेरबदल करण्यास परवानगी दिली नाही.
७ डिसेंबर रोजी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी उत्सुक असलेल्या येडियुरप्पा यांनी मंजुरी मिळावी या आशेने नड्डा यांच्याशी नवी दिल्ली येथे चर्चा केली.
येडियुरप्पा आणि उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी जवळपास एक तास नड्डा यांच्यासोबत चर्चा केली. परंतु त्यांना केंद्रीय नेतृत्वाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
पक्षातील नेत्यांचे एक मत असे आहे की, येडीयुरप्पा यांनी राज्यात आपली सत्ता बळकट करण्यासाठी मराठा विकास महामंडळ आणि वीरशैव-लिंगायत विकास महामंडळ स्थापन करण्याचा आदेश दिला असावा.
दरम्यान अनेक मंत्रीपदाचे उमेदवार मंत्रिमंडळात येण्याची वाट पाहत आहेत आणि त्यांना सामावून घेण्यात आणखी विलंब झाल्यामुळे येडियुरप्पा नाराज झाले आहेत.
पक्षाच्या नेतृत्वाने येडियुरप्पा यांना वाट पहात ठेवले आहे. सप्टेंबरमध्येही येडियुरप्पा यांनी नवी दिल्लीला भेट दिली आणि तीन दिवस त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी प्रयत्न केले. त्यांच्या भेटीदरम्यान येडियुरप्पा यांनी काही मंत्र्यांना वगळून आणि नवीन चेहरे सामील करून आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासंदर्भातही चर्चा केली आहे.