प्रतिनिधी/ पणजी
दृष्टी कंपनीच्या त्रासातून बाहेर पडलेल्या जीवरक्षकांच्या मागण्या आणि त्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांनी त्वरित सोडवाव्यात. त्यांना गोवा संसाधन विकास महामंडळातर्फे सरकारी सेवेत घेण्याची हालचाल करण्याचा विचार करावा. येत्या 15 दिवसात जीवरक्षकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी गोवा ट्रेड युनियन असोसिएशनचे नेते ऍड. अजितसिंह राणे आणि स्वाती केरकर यांनी केली.
मागील 1 वर्षांपासून दृष्टीचे जीवरक्षक आपल्या मागणी पूर्ण करण्यासाठी आंदोलन करत आहेत. यापूर्वी दृष्टीकडे हे जीवरक्षक काम करत होते. त्यानंतर त्या कंपनीच्या त्रासाला कंटाळून मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन केले. याशिवाय मुख्यमंत्र्यांकडेही बैठक घेण्यात आली आणि त्यांनी जीवरक्षकांच्या समस्या सोडवून त्यांना सरकारी सेवेत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या आश्वासनावर अजूनही जीवरक्षक आशा लावून बसले आहेत. आता तर कोरोना महामारीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी स्वाती केरकर यांनी केली आहे.