स्वॅब अहवाल येईपर्यंत शिक्षकांनी क्वारंटाईन राहवे – आरोग्य विभाग
प्रतिनिधी / कणकवली:
कणकवली तालुक्यात शुक्रवारी पुन्हा आठजणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी कोरोना चाचणी करण्यात आलेल्या काही शिक्षकांचा समावेश असल्याचे समजते. यामुळे शाळा सुरू करण्याचा विषय पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. सावंतवाडी तालुक्यातही कोरोना टेस्टमध्ये आतापर्यंत पाच ते सहा शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात एका मोठय़ा शाळेचा मुख्याध्यापक पॉझिटिव्ह आला आहे.
शुक्रवारी पॉझिटिव्ह सापडलेल्यांमध्ये कणकवली शहरातील चार, जानवली दोन, तर घोणसरी व फोंडाघाट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्हची संख्या 1598 झाली आहे. आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात शाळा सुरू करण्यासाठी चाचणी केलेल्या काही शिक्षकांचा समावेश असून आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांची पुन्हा चार-पाच दिवसांनी चाचणी करावी लागणार आहे. त्यामुळे शाळा सुरू होणार किंवा कशा? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, स्वॅब टेस्ट दिलेल्या शिक्षक व अन्य रुग्णांनी स्वॅबचा अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन राहवे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.