Tarun Bharat

मुरगावच्या पालिका कामगारांवर पुन्हा आर्थिक संकट

दोन महिने वेतन नाही, पालिका वेतनासाठी कर्ज काढण्याच्या तयारीत

प्रतिनिधी /वास्को

मुरगावच्या पालिका कर्मचारी व कामगारांना मागच्या दोन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. वेतनाच्या समस्येने या कर्मचाऱयांसमोर पुन्हा गंभीर संकट उभे केले आहे. मागच्या काही वर्षांपासून मुरगावच्या पालिका कर्मचाऱयांना ही समस्या सतावत असून या समस्येवर कायम तोडगा काढणे पालिकेला शक्य झालेले नाही. सध्या मुरगाव पालिका कामगारांचे वेतन फेडण्यासाठी कर्ज काढण्याच्या तयारीत आहे.

मुरगाव पालिका मागच्या काही वर्षांपासून अर्थिक संकटात असून या संकटाचा थेट परीणाम पालिकेच्या कामगार व कर्मचाऱयांवर होत आहे. मुरगाव पालिकेकडे जवळपास साडे तीनशे कर्मचारी असून त्यांच्यासाठी दरमहा एक कोटी तीस लाख रूपये वेतनाच्या रूपाने फेडावा लागतात. मात्र, ही रक्कम उभी करणे पालिकेला महाकठीण ठरू लागलेले आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा कामगारांच्या वेतनाचा प्रश्न उभा राहात आहे. यापूर्वी काही वेळा मुरगाव पालिका कामगार वेतनाच्या मागणीसाठी संपावर गेले होते. आता पुन्हा कामगारांवर संपावर जाण्याची पाळी येण्याची शक्यता आहे. मंगळवारी पालिका कामगार व नेत्यांमध्ये या प्रश्नावर पुन्हा चर्चा होऊन पुढील कृतीबाबत निर्णय होणार आहे.

मुरगावच्या पालिका कामगारांना डिसेंबर महिन्यात वेतन देण्यात आले होते. त्यानंतर जानेवारी व फेब्रुवारीत वेतन मिळालेले नाही. दोन महिन्यांच्या वेतनावीना पालिका कामगार दिवस काढीत असून वेतना अभावी त्यांच्या पुन्हा पुन्हा आर्थिक संकट कोसळत असते. पालिकेचे कामगारच नव्हे तर पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱयांनाही सध्या पेन्शनला मुकावे लागलेले आहे. पेन्शनधारकांना अन्य कसलाच आधार नसल्याने त्यांची स्थिती अधिकच गंभीर बनलेली आहे. कर्जफेड होत नसल्याने बँकांचे व्याज वाढत आहे. औषोधोपचाराचा खर्चही अडलेला आहे. या कामगार वर्गाचा सर्वच आर्थिक व्यवहार अडलेला असून पोटापाण्याची आबाळ होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे आमचे दोन महिन्यांचे वेतन त्वरीत फेडावे अशी मागणी कामगारांकडून होऊ लागलेली आहे. या प्रश्नावर कामगारांनी मुख्याधिकारी व मुरगावच्या नगराध्यक्षांची भेट घेतलेली आहे. मार्च उजाडण्यापूर्वी कामगारांचे वेतन फेडण्यासाठी पालिकेची धडपड चाललेली आहे. सध्या पालिकेने हे वेतन फेडण्यासाठी बँकेकडून कर्ज काढण्याचा पर्याय निवडलेला असल्याचे सुत्रांकडून समजते. कर्ज काढून कामगारांना वेतन देण्याची पाळी आल्यास भविष्यात हा वेतनाचा प्रश्न अधिकच गंभीर बनण्याची शक्यता आहे.

पालिका कामगारांच्या वेतनाचा प्रश्न मुरगाव पालिकेला आता नवीन राहिलेला नाही. या प्रश्नाची अधिकाऱयांना आणि कामगारांना चिंता असते. कामगार वर्गाचे आतापर्यंत प्रशासनाला सहकार्यच लाभलेले आहे. मात्र, वेतन अडल्यास सर्वच आर्थिक व्यवहार अडचणीत येत असल्याने कामगारांसमोरही आवाज उठवण्याशिवाय पर्याय नाही. मुरगाव पालिकेला सध्या वेतनासह सर्वच बाबतीत वाढीव खर्चाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, मागच्या दोन दशकांपासून महसुल वाढवण्याचे तसेच महसुलाचे अन्य स्त्रोत निर्माण करण्याचे खास प्रयत्न पालिकेकडून झालेले नाहीत. तसेच पालिकेला पूर्वी दरवर्षी सरकारकडून मिळणारा ऑक्ट्रॉय करसुध्दा मिळणे बंद झालेला आहे. तसेच पालिकेला त्यांच्या शहरातील मालमत्तेच्या माध्यमातून मिळणारे भाडेही थकलेले असून ही थकबाकी कोटींच्या घरात आहे. ही थकबाकी वसुल करण्यासही पालिकेला म्हणावे तसे यश येत नाही. जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत मुरगाव पालिकेवरील आर्थिक संकट टळणार नाही. वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाने कायम उपाययोजना करावी अशी कामगारांची मागणी आहे.

Related Stories

पुढील सरकार तृणमूल काँग्रेसचे

Amit Kulkarni

पावसाच्या संततधारामुळे पेडणेत जनजीवन विस्कळीत

Omkar B

भाजपकडून गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांचा निषेध

Omkar B

आम्रेखाजन बांधाच्या दुऊस्तीसाठी ढवळीकर ट्रस्टतर्फे आर्थिक मदत

Patil_p

आमदार अपात्रता याचिका आता विशेष खंडपीठासमोर : 10 रोजी सुनावणी

Amit Kulkarni

कॅसिनो बंद करा, आंदोलन मागे घेतो

Patil_p