प्रतिनिधी/ सातारा
खेड परिसरात रहात असलेल्या एका महिलेचा पतीबरोबर घटस्फोटाचा खटला सुरु असताना त्या महिलेच्या कायदेशीर रखवालीत असलेल्या मुलीस ताब्यात देण्याची मागणी करत साताऱयातून महिलेचे अपहरण करत पतीने तिला बेदम मारहाण जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी तिच्या पतीसह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार स्नेहल तानाजी गोरे (वय 25, रा. विमलविश्व अपार्टमेंट, खेड, सातारा) या साताऱयात राहतात. त्यांचे मूळ गाव कुर्डू, ता. माढा असून यातील संशयित आरोपी पती तानाजी गणेश गोरे यांचे पहिले लग्न झाले असताना देखील ते लपवून ठेवत त्यांनी फसवणूक करुन स्नेहल यांच्याशी लग्न केले. यामध्ये त्यांच्या पतीला विठ्ठल माळी याने संगमनमत करुन मदत केली होती.
दि. 23 रोजी तानाजी गोरे साताऱयात कार घेवून आला त्याने स्नेहल गोरे यांना मुलगी तेजस्वी हिला माझ्या ताब्यात दे असे सांगितले. मात्र, गोरेंनी त्याला नकार दिल्यावर त्यांना कारमध्ये जबरदस्तीने घालून अक्कलकोटच्या पुढे कर्नाटकच्या सीमेपर्यंत नेले. यावेळी गोरे यांचे हातपाय दोरीने बांधून मारहाण, शिवीगाळ करत कारमध्ये बेदम मारहाण केली. दोन दिवस अपहरण करुन ताब्यात ठेवत स्नेहल गोरे यांच्या आईला फोन करुन तेजस्वी हिला माझ्या ताब्यात द्या अन्यथा स्नेहल हिला मारुन टाकण्याची धमकी दिल्याची तक्रार स्नेहल गोरेंनी दिली. पोलिसांनी तानाजी गोरे व विठ्ठल माळी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून या गुन्हय़ाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोकडे करत आहेत.