Tarun Bharat

मुलगी, नातवाच्या भेटीसाठी गेल्या व शारजात अडकून पडल्या…

मडगावातील ज्येष्ठ नागरिक कॉन्सेसांव फर्नांडिस बोरकर यांची कहाणी : दीड महिन्यापासून विदेशी भूमीत : गोव्यात कधी परतता येईल याकडे लक्ष

प्रसाद नागवेकर / मडगाव

मडगावच्या रहिवासी असलेल्या 67 वर्षांच्या कॉन्सेसांव फर्नांडिस बोरकर या दर 6 महिन्यांनी आपल्या मुलीला आणि नातवाला भेटण्यासाठी एका महिन्याच्या कालावधीकरिता संयुक्त अरब अमिरातीतील शारजाला जात असतात. त्यानुसार यावेळीही त्या सदर ठिकाणी गेल्या होत्या. परंतु कोरोनाची महामारी व त्यामुळे जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे त्या तिथेच अडकून पडल्या आहेत. यावेळी मुक्काम एका महिन्यापेक्षा जास्त झाला असून आणखी किती दिवस राहावे लागेल याची कल्पना नाही, असे त्यांनी शारजा येथून बोलताना सांगितले.

आपण 4 मार्च रोजी ‘व्हिजिट व्हिसा’वर आले होते आणि 23 रोजी परतणार होते. कोरोना विषाणूच्या साथीच्या तीव्रतेची आपल्याला कल्पना नव्हती आणि नेहमीप्रमाणे खरेदी करून लवकरच आपणास परत घरी येता येईल असे वाटले होते. माझी मुलगी त्या महिन्यात घरातूनच काम करू लागली. लवकरच आपल्या लक्षात आले की, आता सर्व काही बदलले आहे. आपण जाणार असलेल्या विमानाचे उड्डाण रद्द झाले असून ते 2 आठवडे पुढे ढकलल्याचे 21 रोजी एअर अरेबियाने कळविले. 3 एप्रिल रोजी एका महिन्याच्या व्हिसाची मुदत संपत असल्याने त्यापूर्वी आपल्याला देशाबाहेर जायचे होते, असे कॉन्सेसांव यांनी सांगितले.

विमानाचे उड्डाण परत रद्द झाल्यानंतर तिकीट लांबणीवर टाकण्यासाठी शुल्क भरावे लागत असल्याने आम्ही तिकीट रद्द केले. कारण संपूर्ण जगासह युएईमध्येही परिस्थिती अधिकच वाईट होत चालली होती. आता व्हिसा नूतनीकरणाची समस्या निर्माण झाली.  जोपर्यंत विमानांची उड्डाणे कार्यरत होत नाहीत तोपर्यंत व्हिसा वैध ठरणार असल्याचे वृत्तपत्रांनी म्हटले होते आणि विमानांची उड्डाणे 15 एप्रिलपासून सुरू होणार होती. परंतु ट्रव्हल एजंटांना व्हिसा नूतनीकरणासाठी कॉल करण्यास सुरुवात केला असता त्यांनी भलतीच गोष्ट सांगितली. प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी इमिग्रेशन विभागात कॉल केला असता कोणीही कॉल उचलला नाही, असे त्यांनी सांगितले.

व्हिसा नूतनीकरण गेले पाण्यात

शेवटी एका ट्रव्हल एजन्सीला व्हिसाच्या एका महिन्याच्या नूतनीकरणासाठी 950 दिरहॅम (18 हजार रुपये) दिल्यानंतर आम्हाला कळले की, 30 मेपासून उड्डाणे सुरू होतील. ही एक भयानक परिस्थिती होती. कारण आम्ही पैसे गमावत होतो, कोणीही व्हिसाबद्दल सत्य सांगायला तयार नव्हते आणि आपली औषधेही संपत होती. शेवटी 2150 दिरहॅम भरून (38 हजार रुपये) 90 दिवसांचा व्हिसा मिळाला. पण दुर्दैवाने विस्तारित व्हिसा हातात येताच सरकारने जाहीर केले की, सर्व भेट व्हिसा 31 डिसेंबर, 2020 पर्यंत वैध आहेत आणि कोणालाही नूतनीकरण करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आम्ही 38 हजार रुपये गमावले, असे कॉन्सेसांव यांनी सांगितले.

आपली दुसरी समस्या होती ती म्हणजे औषधे. आपल्याला मधुमेह आहे आणि कॉलेस्ट्रॉलच्या गोळय़ा देखील घेते. औषधांचा फक्त 1 महिन्याचा कोटा घेतला होता.  भारतातल्याप्रमाणे आपण कोणत्याही औषधालयामध्ये जाऊन औषधे गोळा करू शकत नाही. भेट व्हिसावर असल्यामुळे आपल्याकडे वैद्यकीय विमा कार्ड नाही आणि  क्लिनिकला गेल्यास संसर्ग होण्याची भीती होती. शेवटी अल नहदा शारजामधील अल-देयफा मेडिकल सेंटरची निवड केली. तेथील डॉ. हकीम यांनी खूप मदत केली.  आता 3 महिन्यांसाठी प्रिस्किप्शन आणि औषधे मिळाली आहेत, असे त्यांनी सांगितले.

परिस्थितीशी जुळवून घेतले आहे

मुलीने खबरदारीचा उपाय म्हणून आपले बाहेर जाणे पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे तुरूंगात असल्यासारखे वाटते. आपले दररोजचे चालणे देखील थांबविले गेले होते. आपली आरोग्यविषयक स्थिती पाहून मुलीला ट्रेडमिल खरेदी करावी लागली. आता येथील परिस्थितीशी आपण जुळवून घेतले आहे. बातम्या ऐकत असताना आपल्याला असे वाटते की, आम्ही येथे अधिक सुरक्षित आहोत, असे कॉन्सेसांव म्हणाल्या.

गोव्यात कसे जायचे ही चिंता

येथे किराणामालाची दुकाने उघडली असून आम्हाला चांगली फळे आणि भाज्या आणि कधी कधी सुपरमार्केटमधून मासे देखील मिळतात. सुदैवाने आपल्या मुलीने मोबाइलवर सोय करून दिल्याने दररोज आपण इतर मुलांशी बोलू शकते. पण आता आणखी एक भीती निर्माण झाली आहे की, परत गोव्यात कसे जायचे. आपण नेहमी विचार करते की, आपल्याला गोव्यात पोहोचल्यावर 14 दिवस अज्ञात ठिकाणी विलगीकरणात ठेवल्यास कसे होणार, असे कॉन्सेसांव यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबापासून वेगळे ठेवू नये

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि सर्व संबंधित अधिकाऱयांना आपण विनंती करते की, त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी नियम शिथील करून त्यांना कुटुंबापासून वेगळे करून विलगीकरणात ठेवू नये. कारण त्यामुळे त्यांच्या आरोग्याची स्थिती बिघडू शकते. सर्व ज्ये÷ नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये विलगीकरणात ठेवण्यासाठी कुटुंबियांच्या स्वाधीन केले जावे. यामुळे आपल्यासारख्या विदेशात अडकून पडलेल्या लोकांना परत भारतात गेल्यावर थोडी मानसिक शांती मिळेल, असे कॉन्सेसांव म्हणाल्या.

Related Stories

कुडचडेत रूचा वस्त यांचा अर्ज

Amit Kulkarni

ग्रामपंचायतींचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न

Patil_p

डिचोली साखळीत माटोळीचा बाजार फुलला

Amit Kulkarni

ज्येष्ठ हार्मोनियम वादक विष्णू महाले यांचे निधन

Amit Kulkarni

चॅम्पियन्स चेस अकादमीतर्फे विविध ऑनलाईन स्पर्धा

Amit Kulkarni

ऍम्ब्युलन्समध्येच झाला बाळाचा जन्म…

Patil_p