Tarun Bharat

मुलींना शाळेच्या वाटेवर नेणारी ‘सायकल बँक’

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा पुढाकार

250 शाळांसाठी दोन हजार सायकलचे वाटप

प्रतिनिधी / मालवण:

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ात मानव साधन विकास संस्थेंतर्गत ‘परिवर्तन केंद्र’ नियोजित जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग, गोवा व पुणे विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायकल बँक’अंतर्गत 250 शाळांना दोन हजार सायकल सुपूर्द करण्यात येत आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यावतीने मुलींना सायकल उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षण आणि मुलींना शिक्षणासाठी येणाऱया अडचणींवर मात करण्यासाठी सायकल बँक ही योजना साकारण्यात येत आहे, अशी माहिती जनशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली.

या उपक्रमाबद्दल बोलताना केनवडेकर म्हणाले, अनलॉकनंतर आता कुठे शाळा आता सुरू होत आहेत. मात्र, एसटी बसफेऱयांना भारमान नसल्याने अनेक गावांतील बसेस थांबविण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी गावात एसटीच जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गरीब कुटुंबातील शाळकरी मुलांना शाळेत येण्यात अडचणी येत आहेत. यासाठी माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांच्यावतीने ग्रामीण भागातील मुलांसाठी सायकल देण्याची योजना आखण्यात आली आहे. आतापर्यंत प्रभू यांनी जिल्हय़ात राबविलेल्या सर्वच योजना यशस्वी झालेल्या असल्याने याही योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.

काय आहे ‘सायकल बँक’ संकल्पना?

  रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा हा 70 टक्के ग्रामीण क्षेत्र आहे. तालुका स्कूल, माध्यमिक हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात. शाळेतील 25 ते 30 टक्के विद्यार्थी बसने येतात. त्यातच ग्रामीण भागात ठरावीक बसेस असल्याने वेळेआधी व शाळा सुटल्यावर उशिरा घरी जावे लागत असे. यासाठी प्रभू यांनी गोवा व पुणे विमानतळ प्राधिकरणला सायकलचे वाटप करण्याची सूचना केली. मानव साधन विकास संस्थानच्या अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभू यांनी यासाठी पुढाकार घेतला. आठवी ते दहावीतील ज्या मुली शाळेला तीन ते चार किमीवरून येतात, त्यांना सायकल दिली जाते. दहावी झाली, की सायकल परत शाळेत आणून द्यायची. मग परत ती सायकल दुसऱया गरजू मुलीला देता येईल, असे यासाठी निश्चित करण्यात आले आहे.

 मुलींनाच सायकल्स का?

 सायकल मिळाल्याने मुलगी शाळेत वेळेत जाऊ शकते व घरी येऊ शकते. त्यामुळे मुलीच्या आईला असणारी काळजी थोडी फार कमी होईल. आठवी ते दहावीच्या मुलींमध्ये शारीरिक परिवर्तन होत असते. सायकल चालविल्याने व्यायाम होतो. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य मिळते. चांगली सायकल व्यवस्थित वापरली, तर पंधरा ते वीस वर्षे चालते. मुली दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी शहरात येतात मग सायकल अडगळीत पडते. तसे न होता, परत सायकल वापरात येऊ शकते. यामुळे दहावी झाल्यानंतर ही सायकल इतर मुलींसाठी परत शाळेकडे जमा करावी लागणार आहे, असेही जनशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी स्पष्ट केले.

सायकल बँक

बँकेत ठेवलेली ठेव वापरात येते व व्याजाने वाढत राहते. तशीच सायकल बँक म्हणून दहावीनंतर सायकल बँकेत. मग सायकलमध्ये वाढ कशी होणार? सुरेश प्रभू यांनी 250 शाळेत दहा सायकल शाळेच्या बँकेत फिक्स डिपॉझिट केल्या आहेत. सामाजिक जाणीवेतून बँक आपण चालविली पाहिजे. माझ्याकडील वापरात नसलेली सायकल सुस्थितीत शाळेत देऊ शकतो. परिवारातील एक वाढदिवस सायकल देऊन साजरा करू शकतो. शिक्षक निवृत्त होताना भेट म्हणून सायकल द्यावी. दहावीनंतर शाळेला निरोप देताना माजी विद्यार्थी सायकल देऊ शकतात. आपण ठरवले, तर प्रत्येक मुलाला सायकल उपलब्ध होऊ शकते. आपण सर्वजण सायकल बँकेचे खातेदार होऊया, असेही आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

  एक दिवस सायकलचा

 शाळेचा, गावाचा एक दिवस सायकलचा उपक्रम राबवून सर्वजण गावात फिरताना एक दिवस सायकल डे संकल्पना करू शकता. पर्यावरण संतुलनासाठी आपण सहाय्य करू शकता. माजीमंत्री सुरेश प्रभूंनी 250 ई सायकल (बॅटरीवर चालणारी), 500 सायकल गरजू महिलांना, मुंजाळ फाऊंडेशनकडून व 2000 सायकल शालेय विद्यार्थिनींना गोवा व पुणे विमानतळ प्राधिकरणकडून उपलब्ध करून दिल्या आहेत. 0 टक्के मेंटेनन्स यावा, अशा दणकट सायकलची निवड उमा सुरेश प्रभू यांनी केली आहे. त्यांनी ठरविले असते, तर कुणालाही सायकली दिल्या असत्या पण विश्वासाने दिलेले दान गरजूंपर्यंतच पोहोचले पाहिजे, या कटाक्षानेच प्रत्यक्ष जनशिक्षण संस्थेमार्फत सर्व्हे करून मुलींची खात्री करूनच परिवर्तन केद्रांमार्फत सायकल सुपुर्द करण्यात आल्या आहेत. सायकल बँक उपक्रमात सहभागी व्हायचे असल्यास प्रकल्प अधिकारी विलास हडकर (9421146062) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विजय केनवडेकर यांनी केले आहे.

Related Stories

माजगाव ग्रामदेवस्थान निधी समितीच्याअध्यक्षपदी आनंद सावंत

Anuja Kudatarkar

पहिली ते आठवीच्या शाळा ६ जानेवारी पासून बंद

Anuja Kudatarkar

युवकांनी उभारलेली निर्माल्य कुंडं ठरली प्रदूषण रोखण्यास उपयुक्त

NIKHIL_N

माजगाव भाईसाहेब सावंत मा. विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन उत्साहात

Anuja Kudatarkar

वेंगुर्ले नगरवाचनालय संस्थेचे आदर्श पत्रकार, साहित्यिक, ग्रंथालय पुरस्काराचे वितरण संपन्न

Anuja Kudatarkar

टीका करणारे निवडणुकीत पडतात

Patil_p