Tarun Bharat

मुशर्रफना फाशी सुनावणाऱ्या न्यायाधीशाचा कोरोनाने मृत्यू

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावणारे पाकिस्तानातील पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार सेठ यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. त्यांचे वय 59 वर्षे होते. 22 ऑक्टोबरला त्यांची चाचणी घेण्यात आली होती. त्या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

उपचारांना ते प्रतिसाद देईनासे झाल्यानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी इस्लामाबादच्या कुलसूम आंतरराष्ट्रीय रूग्णालयात हलविण्यात आले होते. तेथेच गुरूवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. जून 2018 मध्ये त्यांनी पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथग्रहण केले होते. त्यापूर्वी एका विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम पाहताना त्यांनी सध्या विदेशात वास्तव्यास असणारे पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून न्या. सेठ हे प्रसिद्धीच्या झोतात होते. मुशर्रफ यांनी या शिक्षेविरोधात पाक सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. तसेच ते सध्या पाकमध्ये वास्तव्यास नसल्याने फाशीच्या शिक्षेचे क्रियान्वयन होऊ शकलेले नाही.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेले ते पहिलेच उच्चपदस्थ न्यायाधीश आहेत. त्यांच्या निधनावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान, पाकचे सरन्यायाधीश गुलझार अहमद आणि इतर अनेक मान्यवरांनी शोक प्रगट केला आहे.

Related Stories

एअर इंडियासाठी अडचण

Patil_p

बायडेन यांची युक्रेनला अचानक भेट

Patil_p

अमेरिका दिवसभरात 4 हजार बळी

Patil_p

पाकला मदत करण्यास फ्रान्सचा नकार

datta jadhav

अब्जावधींचा रोजगार धोक्यात

Patil_p

भारत-चीन चकमकीत चीनचे 5 सैनिक ठार, 11 जखमी

datta jadhav