सर्व लोकसेवा फौंडेशनच्यावतीने येळ्ळूरमध्ये उपक्रम
प्रतिनिधी / येळ्ळूर
गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. यावेळी मोठय़ा भक्तीभावाने गणेशमूर्ती खरेदी करतात. मात्र काही मूर्ती खरेदी केल्या जात नाहीत तसेच त्या भग्न अवस्थेत तशाच विपेते सोडुन जातात. त्या मूर्तींची पूजा करत त्याचे विसर्जन सर्व लोकसेवा फौंडेशनच्यावतीने येळ्ळूर येथे करण्यात आले.
मूर्तीकार मूर्ती करुन त्याची विक्री विविध ठिकाणी करत असतात. मात्र त्या विक्री न झाल्याने काही मूर्तीकार तशाच त्या मूर्त्या ठेवून जातात. शहर तसेच उपनगरांमध्ये अशा अनेक ठिकाणी या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. याची माहिती सर्व लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष विरेश बसय्या हिरेमठ यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी त्या मूर्ती जमा करुन येळ्ळूर येथे नेवून त्या मूर्त्यांचे पूजन करुन विधीवत विसर्जन केले.
विरेश हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य करण्यात आले. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, श्री चांगळेश्वर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अजय पाटील, बाळकृष्ण अनंत पाटील, हेमंत पाटील, विश्वनाथ पाटील, केदारी कुंडेकर, श्रीकांत मोरे आदी उपस्थित होते.