Tarun Bharat

मूर्तीची नको, भक्तीची उंची वाढवा!

डामरेत दीड दिवसाचा गणपती बसविण्याबाबत चाचपणी

अजय कांडर / कणकवली:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण मोठय़ा उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यावर मर्यादा आली आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये निरुत्साह असतानाच आता राज्य शासनाने ‘गणेश मूर्तींची उंची नको, भक्तीची उंची वाढवा’ असे आवाहन केल्यामुळे शहरासह सिंधुदुर्ग जिल्हय़ासारख्या ग्रामीण भागातील गणेश मूर्तींच्या उंचीवरही मर्यादा येणार हे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे कोकणातही चाकरमानी गणेशोत्सवाला कमी येण्याची शक्मयता असल्याने इथेही हा उत्सव दरवर्षीसारखा धुमधडाक्मयात होण्याची शक्मयताच मावळली आहे.

अनेक गावांत या गणेश चतुर्थीत चाकरमान्यांनी मोठय़ा संख्येने येऊ नये, यासाठी गावपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. डामरे गावात फक्त दीड दिवसांचाच गणपती बसविण्यात यावा, यासाठी गावपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. हा निर्णय गावात झाला, तर गावातील आरोग्याच्यादृष्टीने चांगला निर्णय होईल, असा विश्वास ग्रामस्थ अण्णा सावंत यांनी व्यक्त केला.

 सावंत म्हणाले, कोरोनाचे संकट अभूतपूर्व आहे. या कालावधीत लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटात गणेशोत्सव इच्छा असूनही उत्साहात साजरा करणे शक्य नसल्याने डामरे गावात घरोघरी दिड दिवसांचा गणपती बसविण्यासाठी सध्या विचारविनिमय सुरू आहे. यासाठी अनेकांनी पसंती दर्शविली, तरी अंतिम निर्णय झालेला नाही. गावात गणेशोत्सव कालावधीत शक्यतो चाकरमान्यांनी कमी संख्येने यावे आणि जे येतील, त्यांनी आधी येऊन नियमाप्रमाणे क्वारंटाईन व्हावे. नंतर गणेशोत्सव साजरा करावा.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे. तळकोकणासह ज्या मोठय़ा शहरात गणेशोत्सव उत्साहात सार्वजनिक पद्धतीने साजरा केला जातो, त्याच शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईतील संख्या लाखाच्या आसपास पोहोचली आहे. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर अशा शहरांतही रुग्ण संख्या वाढत आहे. या सर्व शहरात गणेशोत्सवात भक्तगण एकत्र येतात.

राज्यातील गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेरील लोकांच्यादृष्टीने आकर्षणाचा विषय ठरत आलाय. सार्वजनिक गणेशोत्सवात बसविण्यात येणारी श्रींची मूर्तीही मोठय़ा उंचीची असते. ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळते. त्याचा परिणाम होऊन आता कोकणात काही भागात सार्वजनिक गणेशोत्सवात गणपती मूर्तींची उंचीही मोठी असते. गणपतीच्या मोठय़ा मूर्ती उचलण्यासाठी अनेक नागरिकांना एकत्र यावे लागते. कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणे क्रमप्राप्त असल्याने गणेश मूर्ती उंच बनविण्याला मर्यादा घालण्याबरोबर ती जास्त वजनाचीही असू नये, याचीही काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. गावासह शहरातही चार फूट उंचीपेक्षा जास्त गणेश मूर्ती बसविण्यात येऊ नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केले आहे. यावर भक्ती महत्वाची, गणेश मूर्तीची उंची नाही, अशीही प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सर्व गावात असा आदर्श व्हावा!

तालुक्यातील डामरे गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिड दिवसांचा गणपती घरोघरी बसविण्याच्यादृष्टीने विचार होत आहे. असे खरेच झाले, तर तो महामारीत नागरिकांनी कसे वागले पाहिजे, याचा वस्तूपाठ ठरेल. असा निर्णय कोकणातील इतर गावांनी घ्यावा. त्यातून सणाच्या हौसेपेक्षा मनातील भक्तीच मोठी ठरेल!

Related Stories

मंडणगडात अडीच हजार नागरिकांना स्थलांतराचे आदेश

Patil_p

दोडामार्गमधून 138 परप्रांतीय कामगार रवाना

NIKHIL_N

पुढील वर्षी कोमसापच्या मदतीने जिल्हास्तरावर बालसाहित्य संमेलन !

Anuja Kudatarkar

मालवणात महावितरणची इमारत धोकादायक

NIKHIL_N

चर खोदाईबाबत उपाययोजना न केल्यास रस्ता बंद करू – भोगटे

Anuja Kudatarkar

जिल्हावासियांनी दिला लॉकडाऊनला 100 टक्के प्रतिसाद

Patil_p