Tarun Bharat

मृत्युंजयनगरातील जलवाहिनीला गळती

मोठय़ा प्रमाणात पाणी वाया : एलऍण्डटी कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार

प्रतिनिधी /बेळगाव

शहर आणि उपनगरात जलवाहिन्यांना गळत्या लागून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र, जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची दखल एलऍण्डटी कंपनीकडून घेतली जात नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. अनगोळ मृत्युंजयनगर येथे रस्त्याशेजारी असलेल्या जलवाहिनीला गळती लागल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे या नुकसानीला जबाबदार कोण? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी एलऍण्डटी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सध्या शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारीदेखील सोपविण्यात आली आहे. मात्र, कंपनीने सुरळीत पाणीपुरवठा आणि देखभालीकडे कानाडोळा केल्याचे निदर्शनास येत आहे. शेकडो ठिकाणी जलवाहिनीद्वारे पाणी वाया जात आहे. किमान मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जाणाऱया जलवाहिनीची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पण याकडे देखील दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनगोळ परिसरात चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो. या भागातील जलवाहिनीला गळती लागल्यास मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जाते. अशा प्रकारची गळती मृत्युंजयनगर येथील नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ लागली आहे. त्या ठिकाणी गेल्या आठ महिन्यांपासून पाणी वाया जात आहे. याबाबत तक्रार करूनही याची दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जलाशयातून येणारे पाणी शुद्धीकरण करून शहरवासियांना पुरवठा केला जातो.

शुद्धीकरण आणि पाणीपुरवठय़ासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च केला जातो. मात्र हे शुद्ध पाणी वाया जात असल्याने होणाऱया नुकसानीला जबाबदार कोण? असा मुद्दा उपस्थित होत आहे. कॅम्प परिसरात असदखान दर्ग्याजवळ तसेच आरपीडी रोडवरील आयएमईआर परिसरात आणि गणपत गल्ली कॉर्नरजवळ लागलेल्या गळत्यांद्वारे दररोज शेकडो लीटर पाणी वाया जात आहे. एकीकडे नागरिकांना सुरळीत पाणी मिळत नाही. तर दुसरीकडे रस्त्यांवरून पाणी वाया जात आहे. त्यामुळे या प्रकाराबद्दल एलऍण्डटीच्या नावाने ओरड होत आहे.

Related Stories

चार महिन्यांपासून शाळा बंद, शिक्षणतज्ञांना शालेय शिक्षणात खंड पडण्याची भिती

Tousif Mujawar

हुतात्मा चौकानजीक कचऱयाचे साम्राज्य

Amit Kulkarni

10 हजार 462 कामगार बेळगावमध्ये परतले

Patil_p

कोरोना देवदूत सन्मान पुरस्काराने बालाजी चिखले यांचा सत्कार

Amit Kulkarni

अमलीपदार्थ बाळगल्याच्या आरोपातून 7 जण निर्दोष

Omkar B

चुडाप्पा हलगेकर कुस्ती समितीतर्फे फेब्रुवारीत कुस्ती मैदान

Patil_p