Tarun Bharat

मृत्यूच्या तांडवापुढे फ्रान्स हतबल!

मूळ कुडाळच्या चिन्मय सामंतने सांगितले तेथील भीषण वास्तव

  • हॉस्पिटल्स अपुरी, डॉक्टरांची कमतरता
  • रुग्ण अत्यवस्थ झाला, तरच इस्पितळात प्रवेश
  • हजारो पॉझिटिव्ह रुग्ण घरीच घेताहेत उपचार
  • अख्खा देशच झालाय ‘क्वारंटाईन’

शेखर सामंत / सिंधुदुर्ग:

‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इटली, स्पेन, अमेरिकेपाठोपाठ चौथ्या क्रमांकावर असलेला बल्याढय़ फ्रान्स आज कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतोय. सुमारे 1 लाख 13 हजार पॉझिटिव्ह रुग्ण आणि साधारणपणे 11 हजार मृत्यू ही परिस्थितीच सर्वकाही सांगून जाते. रुग्णांसाठी इथे हॉस्पिटल्स अपुरी पडू लागलीत. डॉक्टर कमी पडू लागलेत. त्यामुळे आता शासनाने रुग्ण पॉझिटिव्ह निघाला अथवा लक्षणं दिसू लागली, तरी जोपर्यंत त्याला खूप त्रास होत नाही, तोपर्यंत इस्पितळात दाखल करून न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या देशात कोरोना बाधित रुग्ण स्वत:हून घरात ‘आयसोलेट’ होऊन घेतानाचे चित्र आहे.’

 सिंधुदुर्गचा सुपुत्र असलेला चिन्मय नंदन सामंत याने फ्रान्स येथून ‘तरुण भारत’शी संपर्क साधत तेथील भयानक वास्तव कथन केले. ‘अतिशय शिस्तप्रिय नागरिकांचा देश’ म्हणून ओळखल्या जाणाऱया या देशात नागरिक स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळत असताना तसेच या देशात आरोग्याशी संबंधित सर्व सेवा सुविधा असतानाही हा व्हायरस रोखण्यास देश कसा काय कमी पडतो, याचीच चिंता चिन्मयच्या बोलण्यातून जाणवत होती.

आता स्थिती थोडीफार नियंत्रणात

मूळ कुडाळचा असलेला चिन्मय हा रोबोटिक इंजिनिअर असून तो फ्रान्स येथील एका विद्यापीठात एका विशेष संशोधन कार्यात व्यस्त आहे. तो व त्याची पत्नी या देशातील ट्रान्सबर्ग या जिल्हय़ात राहतात. कोरोनाचा सर्वात मोठा कहर सर्वप्रथम याच जिल्हय़ात झाला होता. त्यात शेकडो लोकांचे बळी गेले होते. आता स्थिती थोडीफार नियंत्रणात असल्याचे तो म्हणाला. या ठिकाणची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सैनिकांना देखील पाचारण करावे लागले, अशी माहितीही त्याने दिली. सध्या संपूर्ण देशच ‘क्वारंटाईन’ झालाय. एरवी देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांनी फुललेले रस्ते आता पूर्णत: सुनेसुने झालेत. 20 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. मात्र लॉकडाऊन व्यवस्थित पाळण्यासाठी याठिकाणी पोलीस फौज तैनात करावी लागत नाही. स्वत:हून लोक लॉकडाऊन पाळतात. त्याचप्रमाणे स्वत:ची काळजी घेतात, असेही तो म्हणाला.

कोरोनावर मात करण्यासाठी लढा

खरं तर अत्याधुनिक सेवा सुविधा व शिस्तप्रिय या देशात कोरोनाचा संसर्ग सहजपणे आटोक्यात आला पाहिजे होता. पण कुठे काय व कशी चूक झाली, हे समजले नाही. लाखाच्या वर कोरोनाबाधित रुग्ण आणि दहा हजारावर मृत्यू हा आकडा या विकसित देशाला मुळीच शोभणारा नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली. मात्र याही परिस्थितीत हा देश कोरोनावर मात करण्यासाठी निकाराने लढतोय, असे तो म्हणाला.

शासनाने घेतली जनतेची जबाबदारी

कोरोना फैलावाने या देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक उद्योग बंद पडले आहेत. व्यवसाय बंद पडले आहेत. लोक घरी बसूनच आहेत. मात्र शासनाने येथील जनतेची पूर्ण जबाबदार घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत कामगार कपात करायची नाही, असे सक्त आदेश शासनाने दिले आहेत. गरज पडल्यास कामगारांचा अर्धा पगार स्वत:च्या तिजोरीतून देण्याची जबाबदारीही शासनाने उचलली आहे. तसेच जनतेची आर्थिकदृष्टय़ा परवड होऊ नये म्हणून याच शासनाने ‘800 मिलियन युरो’चे पॅकेज जाहीर केले आहे. तसेच उद्योजक, व्यावसायिकांना करमाफी त्याचप्रमाणे कर्जांवरील व्याजमाफी देखील शासनाने जाहीर केली आहे. या देशात शेती पूर्णत: यांत्रिक पद्धतीने केली जात असल्यामुळे इथे भारतासारखा शेतकरी वर्ग मोठा नाही. या ठिकाणी लोक मनापासून लॉकडाऊनचे पालन करीत असल्यामुळे हळूहळू हे अरिष्ठ नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, असेही त्याने सांगितले.

भारतात आता दोन आघाडय़ांवर लढाई

भारतातील परिस्थितीबाबत बोलताना चिन्मय म्हणाला, ‘सुदैवाने भारतात कोरोना अजूनही आटोक्यात दिसतोय. पण त्यामुळे माझ्या देश बांधवांनी हुरळून जाऊ नये. कारण खरी लढाई पुढेच आहे. भारत अजून तिसऱया स्टेजमध्ये पोहोचलेला नाही. शासनामार्फत ज्या उपाययोजना केल्या जात आहेत, त्या खरोखरच वाखाणण्यासारख्या आहेत. नागरिकांनीही अतिशय कठोरपणे शासनाच्या सूचनांचे पालन केले पाहिजे. क्षुल्लक चूक देखील संपूर्ण देशाला महाग पडू शकते. आपल्या देशाला दोन आघाडय़ांवर लढावं लागणार आहे. एक कोरोनाविरुद्धचा लढा आणि दुसरे म्हणजे त्या पाठोपाठ येणारी बेकारी. मात्र या कठीण परिस्थितीत मला विश्वास आहे की, माझे देश बांधव हे कोरोनाचे आव्हान मोठय़ा हिमतीने परतवतील आणि जगासमोर एक नवा आदर्श घालून देतील.

Related Stories

हवेच्या आर्दतेत 15 ते 20 टक्क्यांची घट

NIKHIL_N

एसटी चालकाचे निलंबनाविरोधात उपोषण सुरू

Patil_p

खेडच्या जगबुडीत सर्पमुखी माशाचा शोध!

Patil_p

सिंधुदुर्गात व्यापाऱ्यांकडून काळ्या फिती लावून पाठिंबा

NIKHIL_N

वायंगणीतील देवशेतीला प्रारंभ

NIKHIL_N

पडवेमध्ये उद्या पोलीस बंदोबस्तात घेणार स्वॅब

Archana Banage