Tarun Bharat

मेरी जान तिरंगा है..!

1947 च्या शालेय जीवनातील ऐतिहासिक क्षणांना उजाळा : विजयदुर्गचे 81 वर्षीय बॉनी नरोन्हा होते स्वातंत्र्योत्सवाचे साक्षीदार

विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत काढण्यात : आली होती प्रभातफेरी

प्रशांत वाडेकर / देवगड:

15 ऑगस्ट 1947… अर्थातच, स्वातंत्र्य दिवस! इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आपल्या देशाचा ‘तिरंगा’ यादिवशी मोठय़ा डौलाने आसमंतात फडकला. हे सुवर्णक्षण इतिहासाच्या प्रत्येक पानातून आजच्या नव्या पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचले. पण, या स्वातंत्र्योत्सवाचे हे अभूतपूर्व क्षण वयाच्या आठव्या वर्षी विजयदुर्ग येथील बॉनी नरोन्हा यांनी ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने अनुभवले. आता त्यांचे वय 81 वर्षे आहे. मात्र, त्यादिवशी विजयदुर्ग किल्ल्यावर तिरंगा फडकवून सजलेला स्वातंत्र्योत्सव त्यांनी दुर्मिळ फोटोंच्या माध्यमातून आजही आपल्या आठवणीत जतन करून ठेवला आहे.

15 ऑगस्ट 1947 या स्वातंत्र्य दिनी ऐतिहासिक विजयदुर्ग गावातही अनेक घडामोडी घडल्या. या घटनांचे बॉनी नरोन्हा हे साक्षीदार होते. ‘तरुण भारत’शी बोलताना त्यांनी त्या ऐतिहासिक क्षणांना नव्याने उजाळा दिला. ते म्हणाले, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, हे सर्वश्रूत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी अनेक शूरवीर धारातीर्थ पडले. इंग्रजांशी लढताना अनेकांना बलिदान द्यावे लागले. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 हा स्वातंत्र्याचा दिवस सुवर्णक्षणांनी इतिहासात नोंदला जावा, यासाठी प्रत्येक भारतीय सज्ज झाला होता. ऐतिहासिक किल्लेही या सुवर्णक्षणांचे साक्षीदार बनले. या साक्षीदारांपैकीच विजयदुर्ग किल्लादेखील होता.

अभूतपूर्व आनंदात निघाली प्रभातफेरी

मी त्यावेळी विजयदुर्ग येथेच इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होता. 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी आमच्या शाळेच्या गुरुजींनी ‘उद्या सकाळी प्रभात फेरी आहे’, असे आम्हाला सांगितले. त्यानुसार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वा. शाळेतील सर्व मुले वेळेत हजर झाली. बघता- बघता दशक्रोशीतील हजारो लोक प्रभातफेरीसाठी हजर झाले. सर्वांच्याच चेहऱयावर एक अभूतपूर्व आनंद होता. माझ्या वयानुसार त्यादिवशी मला ‘स्वातंत्र्य दिना’ची व्याख्या समजून आली नसली तरी उपस्थित सर्वांच्याच चेहऱयावरील तो आनंद स्वातंत्र्योत्सवाचाच आहे, याची मनोमन खात्री पटली होती.

स्वातंत्र्योत्सवाचा जयजयकार आसमंतालाही भिडला

प्रभातफेरीची जय्यत तयारी सुरू झाली. ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत प्रभातफेरी काढण्याचे निश्चित झाले. विजयदुर्ग येथील सुतार सदाशिव वाडये यांनी आपल्या कल्पकतेने प्लायवूडचा तिरंगा बनविला. या तिरंग्याच्या छत्रछायेखाली प्रभातफेरीला सुरुवात झाली. ‘वंदे मातरम…’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी ऐतिहासिक विजयदुर्गचा परिसर दुमदुमून गेला होता. स्वातंत्र्योत्सवाचा हा जयजयकार आसमंतालाही भिडत होत्या, असे ते म्हणाले.

श्यामराव परुळेकरांच्या हस्ते पहिले ध्वजवंदन

त्या काळचे ज्ये÷ व्यापारी श्यामराव परुळेकर, महादेव उर्फ बाबा परुळेकर, रघुनाथ परुळेकर या प्रभातफेरीमध्ये सहभागी झाले होते. प्रभातफेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यानंतर अनेक ज्ये÷ व्यक्तींनी स्वातंत्र्य लढय़ाची माहिती उपस्थितांना देऊन इंग्रजांच्या जाचातून सुटल्याचा मोकळा श्वासही घेतला. विजयदुर्ग किल्ल्यावर श्यामराव परुळेकर यांच्या हस्ते पहिले ध्वजवंदन करण्यात आले होते, असे नरोन्हा यांनी सांगितले.

वीज नसतानाही उजळला ‘तिरंगा’

त्यावेळी वीज (लाईट) नव्हती. अंधारात रात्री काढल्या जात होता. अशावेळी स्वातंत्र्योत्सवाच्या पहिल्याच दिवशी तिरंगा रात्रीच्या मिट्ट काळोखात फडकवत ठेवणे विजयदुर्गवासीयांच्या मनाला पटणारे नव्हते. यावेळी वाडये यांनी प्लायवूडच्या झेंडय़ाला होल पाडून त्यामध्ये बल्ब बसविला व त्याला ‘डायनामो’ (सायकलची बॅटरी) लावून रात्रभर तिरंगा फडकवत ठेवला होता, असे नरोन्हा यांनी सांगितले.

‘ते’ क्षण आजही प्रज्वलित!

नरोन्हा म्हणाले, 15 ऑगस्ट 1947 रोजी माझे वय अवघे आठ वर्षे होते. पण, स्वातंत्र्योत्सवाच्या निघालेल्या प्रभातफेरीमध्ये स्वातंत्र्य दिनाचे खरे महत्व मला उमगले. काळ पुढे सरकला! तरीही दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी मी अनुभवलेले ‘ते’ सुवर्ण क्षण माझ्या डोळय़ासमोर प्रज्वलित होतात. स्वातंत्र्योत्सवाच्या ऐतिहासिक क्षणांचा मी साक्षीदार राहिलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. विजयदुर्ग किल्ल्यावर ‘साहेबाचे ओटे’ येथे ‘हेलियम- डे’ साजरा करण्याची सुरुवात चंद्रकांत परुळेकर यांनी केली होते. त्यावेळीदेखील आपण त्यांच्यासोबत होतो. या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.

Related Stories

सावंतवाडी खासकिलवाडा येथील तरुणाचा शॉक लागून मृत्यू

Anuja Kudatarkar

विलवडेत कोंबडी वाहतूक करणाऱया टेम्पोला अपघात

NIKHIL_N

दापोलीत चार वर्षाच्या चिमुरडीवर अतिप्रसंग

Archana Banage

परुळे- अण्णासाहेब देसाई विद्या मंदिरचा निकाल १००%

Anuja Kudatarkar

नवनियुक्त लेफ्टनंट दिपाली गावकर यांचा करण्यात आला सत्कार

Anuja Kudatarkar

नगराध्यक्ष बडतर्फीबाबत चौकशी समिती नेमणार!

Patil_p