प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक पुन्हा पाच महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 18 मार्च 2020 रोजीच्या आदेशान्वये 17 जून 2020 पर्यंत, तसेच 17 जून 2020 रोजीच्या आदेशान्वये 16 सप्टेंबर 2020 पर्यंत, 28 सप्टेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये 31 डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने या निवडणुकांना पुन्हा 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता ही मुदतवाढ अजून तब्बल पाच महिन्यांनी पुन्हा वाढविण्यात आली असून या निवडणुका आता 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ात एकूण 775 सहकारी संस्था आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिक्षक पतसंस्था आदींचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत मे 2020 मध्ये संपली आहे.