Tarun Bharat

मोटरसायकल अपघातात उंदरवाडीचा तरुण ठार, एक जखमी

गणेशोत्सवाचे साहित्य आणावयास गेलेल्या युवकावर काळाचा घाला

प्रतिनिधी/ सरवडे

गणेश मंडळाचे साहित्य आणण्यासाठी गेलेल्या उंदरवाडी येथील तरुणांच्या मोटरसायकलला गुरुवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान अपघात होऊन एकजण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. बोरवडे येथे झालेल्या अपघातात संदीप साताप्पा इंदूलकर ( वय ३० ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून ओंकार संभाजी पोवार ( वय २१ ) हा तरुण जखमी झाला आहे. अपघाताची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात झाली आहे.

घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, मृत संदिप व ओंकार हे गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे साहित्य आणण्यासाठी कोल्हापूरला गेले होते. बोरवडे ( ता. कागल ) गावच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या म्हसोबा मंदिराच्या कठड्याला त्यांच्या मोटरसायकलची जोरात धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की, ते दोघेही मोटरसायकलसह अंदाजे पन्नास फूट अंतरावर जावून पडले.

यामध्ये संदिप याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी ओंकारला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जि.प. सदस्य मनोज फराकटे, उंदरवाडीचे सरपंच संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. मुरगूड पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

उंदरवाडीवर शोककळा

मृत संदिप इंदूलकर याचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले असून त्याला सहा महिन्याची मुलगी आहे. संदिप दोन वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई असा परिवार आहे. त्याची परिस्थिती गरिबीची असून त्याच्या मृत्यूमुळे गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येलाच उंदरवाडी गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी उंदरवाडी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

Related Stories

102 व्या घटनादुरूस्तीमुळे निर्माण झालेला मराठा आरक्षण सुनावणीतील संभ्रम दूर करा

Archana Banage

राजेंद्र पाटील-यड्रावकरांच्या समर्थनात जयसिंगपुरात कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन

Abhijeet Khandekar

मास्क विक्रीत कोल्हापूर टॉप-2

Archana Banage

अवैध सावकारीमुळे अर्थिक पिळवणूक होत असल्यास तक्रार करा

Archana Banage

कुंभोज येथे प्रहार अपंग संघटनेच्यावतीने रविवारी दिव्यांग मेळाव्याचे आयोजन

Archana Banage

कोल्हापूर : शाहुवाडीत आणखीन पाच नवे कोरोना बाधित रुग्ण

Archana Banage