अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 1 नोव्हेंबर 2021, स. 11.00
● रविवारी अहवालात नीचांकी वाढीची नोंद
● एकूण 2,263 जणांची तपासणी
● पॉझिटिव्हिटी दर एक टक्केच्या खाली
● दीपावलीचा पहिला दिवस आनंददायी
● नियम पाळूनच दीपावली साजरी करा
● दीपावलीसाठी प्रशासनाकडून सूचना
सातारा / प्रतिनिधी :
गत आठ ते नऊ महिन्यांपासून सातारा जिल्ह्याने कोरोनाचा कहर अनुभवला. मार्च, एप्रिल, मे महिन्यात तर कोरोना संसर्गाने उच्च टोक गाठले होते. प्रचंड भीतीचा पगडा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेडसाठी धावपळ अशा वातावरणात जूननंतर हळूहळू संसर्गाचा वेग ओसरू लागला. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये संसर्गाचा आलेख गतीने खाली आला आणि ऑक्टोबर महिन्यात हा आलेख आता शून्याला भिडू लागला आहे. दीपावलीच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच वसुबारस या दीपावलीच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला असून गत आठ ते नऊ महिन्यांतील नीचांकी फक्त 22 नवीन नोंद झालेली आहे.
रविवारी अहवालात 22 बाधित
गत तीन-चार दिवसापासून बाधित वाढीचा आलेख चांगलाच खाली घसरला, तो 50 च्या खाली राहिलेला असून रविवारच्या अहवालात तर 2,263 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये फक्त 22 जणांचा अहवाल बाधित आला आहे. या निचांकी बाधित वाढीचा मोठा दिलासा दीपावलीच्या पहिल्याच दिवशी मिळालेला असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर देखील 1% टक्केच्या खाली घसरलेला असल्याने लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होण्याचे स्वप्न साकार होईल, असा संदेश परिस्थिती देऊ लागली आहे.
वाढ कमी झाली मात्र काळजी घेऊ
एकीकडे दीपावलीचा आनंद आणि दुसरीकडे बाधित वाढ मंदावण्याची मोठा दिलासा. या स्थितीमध्ये वाटचाल करत असताना अद्याप देखील प्रशासनाकडून सर्व खुले केले असले तरी काळजी घेण्याचं आवाहन केले जात आहे. ज्या पद्धतीने गेल्या वर्षभरात जिल्ह्यात संसर्गाचा वनवास भोगला. त्यामध्ये अनेक कुटुंबांची वाताहत झाली. अनेक कुटुंब प्रमुख गेले. अनेक मुलं अनाथ झाली, अनेक भगिनींच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं. आता या संकटातून मुक्तता होत असताना पुढील काही दिवस, काही महिने तरी काळजी घ्यावीच लागणार आहे. आता दीपावली देखील उत्साहाला थोडीशी मुरड घालूया आणि काळजी घेत वाटचाल करत पुन्हा हे संकट येऊच नये यासाठी सर्व जिल्हावासियांनी कार्यरत राहूया.
प्रदूषण मुक्त दीपावलीचा संकल्प
दीपावलीमध्ये असंख्य दिव्यांचा दिपोत्सव साजरा केला जातो. मात्र हा दीपोत्सव खऱ्या अर्थाने मानवी जीवनातील अंधकार यावर मात करून प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा प्रकाश लाभावा यासाठी हा दीपोत्सव असतो. यामध्ये प्रचंड प्रमाणावर फटाके फोडून ज्या पद्धतीने प्रदूषण केले जातं. त्यामुळं हवेच्या आणि आवाजाच्या प्रदूषणाने प्रत्येक घटकावर परिणाम होत असतो. याचा विचार करूनच यावर्षी देखील प्रदूषणमुक्त दिपावली साजरी करावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच गर्दी टाळून, नियम पाळून कोरोना चे संकट पुन्हा येऊच नये यासाठी सतर्क राहण्याचा संदेश दिला आहे.
जिल्हय़ात लसीकरण 28 लाखांच्या पार
जिल्हय़ात लसीकरणाचा वेग थोडा मंदावलेला आहे. रविवारी फक्त 413 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत जिल्हय़ातील एकूण 28 लाख 28 हजार 908 नागरिकांनी घेतलेली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 63 हजार 730 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 8 लाख 65 हजार 178 एवढी दिलासादायक झालेली आहे.
जिल्हय़ात रविवारपर्यंत
एकूण नमुने 22,30,962
एकूण बाधित 2,51,302
एकूण कोरोनामुक्त 2,43,482
एकूण मृत्यू 6,429
सक्रीय रुग्ण 537
जिल्हय़ात रविवारी
बाधित 36
मुक्त 142
मृत्यू 00, एक उशिरा नोंद