Tarun Bharat

मोदींचे अश्रू

एखाद्या लोकनेत्याच्या डोळय़ातून वाहणाऱया अश्रूंचे मोल काय असते याचा अनुभव गेल्या पंधरवडय़ात शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्या अश्रूंनी आणून दिला होताच. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळय़ातील अश्रुंची संपूर्ण देशात चर्चा आहे. संसदेत पहिले पाऊल टाकताना नतमस्तक झालेले आणि ‘कृपा करावी’ या लालकृष्ण आडवाणींच्या शब्दांनी भावुक झालेले मोदी देशभरातील जनतेच्या लक्षात आहेत. काँग्रेसचे वरि÷ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदारांच्या निरोपाच्या भाषणावेळी पंतप्रधान भावुक झाल्याचे देशाने पाहिले. आपल्या प्रखर वाणीने विरोधकांवर टीका करून त्यांना घायाळ करणारे नरेंद्र मोदी देशाने अनेक जाहीर सभांमधून अनुभवले आहेत. असे नेतृत्व जेव्हा एका काँग्रेस नेत्याच्या त्यातही धर्माने मुस्लिम असणाऱया आणि काश्मीरहून येणाऱया नेत्याविषयी बोलताना भावूक होतात हे थोडे नवलाईचे होते. मात्र असाही एक प्रसंग संसदेत घडून इतिहास झाला आहे. संसदीय लोकशाहीच्या परंपरेला साजेल अशीच ही घटना होती.  नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि गुलाब नबी आझाद हे नव्यानेच काश्मीरचे मुख्यमंत्री होऊन श्रीनगरमध्ये पोहोचले असताना अतिरेक्मयांनी त्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावी या उद्देशाने गुजराती पर्यटकांच्या एका वाहनावर बॉम्ब फोडून 8 जणांचे प्राण घेतले होते. या घटनेची मोदी यांना माहिती देताना आणि मृतांच्या लहान मुलांना भेटताना गुलाम नबी आजाद भावूक झाले होते. सुमारे दीड दशकापूर्वीच्या या घटनेचा उल्लेख करताना पंतप्रधानांचा कंठ दाटून आला. भारत विविधतेने नटलेले राष्ट्र आहे आणि भारतीय संसदेत या विविधतेचा मिलाफ होतो. तेथे होणाऱया चर्चेतून देशाची दिशा ठरते हे गेली सात दशके अनुभवास येते आहे. सभागृहात एकमेकांवर टोकाची टीका करणारे नेते सभागृहाबाहेर आपले मैत्र जपत असतात. देशातील दोन राज्यांचे मुख्यमंत्रीसुद्धा कसे लोकशाहीच्या बंधात होते याचे अत्यंत नेटके उदाहरण मंगळवारी संसदेने अनुभवले. ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत टोकाची भूमिका घेऊन राजकीय वातावरण गढूळ करणाऱया मंडळींनी समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकीय मतभेद आहेत म्हणजे आपण दोन वेगळय़ा ध्रुवांवर उभे आहोत आणि प्रतिवाद करताना कोणताही धरबंद न ठेवता विरोधी विचाराच्या व्यक्तीचे शिरकाण करण्यासाठी आपला जन्म झाला आहे अशा आविर्भावात जी मंडळी व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये वावरत असतात त्यांच्यासाठी ही जोराची चपराक आहे. भले जाती-धर्माच्या मुद्यावर या देशातील निवडणुका अनेकदा लढवल्या गेल्या, एकमेकाच्या विचारधारेला टोकाचा विरोध केला असेल आणि परस्परांना अगदी तलवारीच्या टोकावर धरल्याप्रमाणे भाषा वापरली गेली असेल. तरीही कुठेतरी एकमत साधून देश चालवण्याचा प्रयत्न संसदीय लोकशाहीत होत असतो हे या निमित्ताने देशाच्या समोर आले ते बरेच झाले. नाहीतर तुकडे तुकडे गँग, खान मार्केट, आंदोलनजीवी-परजीवी या टीकेच्या पलीकडे पंतप्रधान पदावर बसलेली एक व्यक्ती अत्यंत भावनाशीलपणे काही घटनांकडे बघते हे जगाला कधीच समजले नसते. मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वातला हा पैलू उघड होणे ही या देशातील लोकशाहीची फार मोठी गरज होती. अर्थात ते करतात अशा प्रकारची टीका ही एकटय़ा मोदींच्या बाजूने होते असे नाही. विरोधी बाजूनेही त्याच पद्धतीने प्रचार-प्रसार होत असतो, तोही चुकीचाच आहे. अच्छे दिन, काँग्रेसमुक्त भारत आणि सब का साथ सब का विकास असे म्हणत मोदी सब का विश्वास पर्यंत पोहोचले आणि त्या प्रत्येक शब्दावर देशातील जनतेने विश्वास ठेवला. त्यांच्या अनेक धोरणांवर वेळोवेळी टीकाही झाली आहे. मात्र तरीही काळानुसार होणाऱया बदलांसाठी देशाची राजकीय परिस्थिती वारंवार बदलत राहते. ती कधीच बदलली जाऊ नये असे वाटणाऱयाकडून जेव्हा लोकशाहीची मुस्कटदाबी होते तेव्हा त्या विरोधात लोकांचा तीव्र आवाज उठतो. संताप निर्माण होतो. असा संताप लोकशाहीच्या चौकटीत आणि कधी कधी या चौकटीला ओलांडूनही व्यक्त झालेला आहे. मात्र जेव्हा अशा घटनांमध्ये अंतिम निर्णय घ्यायची वेळ संसदेवर येते तेव्हा मात्र एकमताने किंवा बहुमताने या देशाला एका विशिष्ट निर्णयावर यावे लागते. अंतिम क्षणापर्यंत स्वतःच्या मतासाठी हट्टाग्रह धरणारे नेते मग आपल्या विचारांना मुरड घालत किंवा दुसऱयाच्या विचारांचाही सन्मान करत काही बाबतींमध्ये दोन पावले मागे येण्याची तयारी दर्शवतात आणि सर्वसमावेशक असे धोरण ठरवले जाते. अनेक पंतप्रधानांच्या काळात अनेकांनी आपल्या टोकाच्या विरोधाला मोडते घातल्याची अनेक उदाहरणे आहेत. या सर्वावर चर्चा यासाठी करायची की, निवडणुकीच्या काळात नमो की रागा असे स्तोम माजवून देशातील काही विशिष्ट माध्यमांनी पोळय़ा भाजायचा धंदा केला. चटपटीत, चमचमीत कारभाराला चांगला प्रतिसाद मिळतो म्हटल्यानंतर त्यांनी दोन विचारधारांना दोन धुवावर उभे करून त्यामध्ये वितुष्ट कसे वाढत जाईल यादृष्टीने मांडणी करण्याचा उपद्व्याप केला. त्याचा परिणाम देशातील हिंदू मुस्लिम ऐक्मयापासून नागरी आणि ग्रामीण जीवनामध्ये दरी निर्माण होण्यात झाला आहे. आधीच आरक्षण आणि विविध मुद्यांवर जातीजातीमध्ये वाढत जाणारे तेढ आणि त्या आगीचा भडका उडवण्याच्या उद्देशाने आभासी माध्यमांकडून ओतले जाणारे तेल, त्याचे विशिष्ट मंडळींकडून होणारे कौतुक हे सारेच धोकादायक होत असताना पंतप्रधानांनी सौहार्दाचे एक उदाहरण समोर ठेवले आहे. त्यांचा पाठीराखा आणि अनुकरण करणारा आणि विरोध करणाऱया वर्गाला या विचारांची जाणीव होण्याची आवश्यकता होतीच.  गुलाम नबी आझाद यांच्या निरोपाच्या कार्यक्रमाने एक सकारात्मक पाऊल पडले. पंतप्रधानांच्या अश्रूचा गैरअर्थ काढण्यापेक्षा त्याचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी आणि विरोधी विचारांचा दोन्ही बाजूने सन्मान होण्यासाठी व्हावा. तसे झाले तर मोदींच्या अश्रूंचे मोल लोकशाहीसाठी अनमोल ठरतील.

Related Stories

सहज उपलब्ध ‘विनामूल्य’-तेच सर्वाधिक ‘अमूल्य’

Patil_p

भाजपाचा नवनिर्धार

Patil_p

भावना…

Patil_p

जानकीनिमित्तें सुरकैवारा

Patil_p

आणि रावळगाव

Patil_p

साधुलक्षणे-हरिभक्तीला प्राण विकणे

Patil_p
error: Content is protected !!