Tarun Bharat

मोदी नाबाद 70, संघ भाजपहून उत्तुंग

Advertisements

स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात लोकोत्तर नेता कोण? कोणाला आवडो अथवा नावडो, पण संघ आणि भाजपाहून मोदींचे नेतृत्व उत्तुंग झाले आहे

स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात लोकोत्तर नेता कोण? नरेंद्र मोदी प्रशंसकांचे म्हणणे मानले तर नुकताच 70 वा वाढदिवस साजरा केलेल्या पंतप्रधानांच्या जवळपास येण्याइतकी कामगिरी 1947 नंतर एकाही नेत्याने केलेली नाही. आज ज्या प्रश्नांना देशाला सामोरे जावे लागत आहे त्या सर्वाना पं. नेहरूच जबाबदार आहेत असा निर्वाळा या मंडळींनी दिलेला आहे. त्याचबरोबर इंदिरा गांधीना आणिबाणी देशावर लादण्याच्या पातकाचे धनी बनवून बाद केलेले आहे. सरदार पटेल हे कधीही थोरच पण त्यांना काँग्रेसने पंतप्रधानपद ना देऊन घोडचूक केली असे त्यांचे मत आहे. म्हणूनच गेल्या 70 वर्षात देशाला नवीन दिशा देणारे मोदींसारखे कोणतेच व्यक्तिमत्त्व नाही असे ठासून सांगितले जात आहे. या सगळय़ा दाव्यात कितपत तथ्य आहे ते येणारा काळ ठरवेल. पण मोदींनी या देशातील राजकारणाचे व्याकरणच बदलले याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही.

गेल्या सत्तर वर्षातील राष्ट्रीय राजकारणावर काँग्रेसचा ठसा राहिलेला आहे. 2002 च्या गुजरात दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मोदींचा बागुलबुवा दाखवून काँग्रेसने 2004 पासून दहा वर्षे केंद्रात सत्ता भोगली. मोदींनी आता हेच राजकारण उलटवून गेल्या सहा वर्षात काँग्रेसचा पालापाचोळा केला हा ताजा इतिहास आहे. आपल्या पराभवाची कारणमीमांसा करणेदेखील टाळल्याने काँग्रेसचे लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकीत पानिपत झाले नसते तरच नवल होते. मोदींची मोहीम अशी प्रभावी ठरली की दोन्ही वेळेला काँग्रेसला विरोधी पक्षनेत्याचे पद मिळण्याइतपत देखील संख्याबळ मिळू शकलेले नाही. मोदींच्या उदयाने होत्याचे नव्हते झाले आहे. राहुल गांधींनाच नेतृत्वपदाची माळ घालून त्यांना भावी पंतप्रधान म्हणून पाहण्याचा अट्टहास धरणाऱया सोनिया गांधींच्या राजकारणाने काँग्रेसमध्ये अजूनच बेदिली माजली आहे. हे मोदींच्या पथ्यावरच पडलेले दिसत आहे. मोदींना प्रादेशिक पक्षांची फारशी फिकीर नाही. त्यांना आपण कसेही वाकवू शकतो याची त्यांना खात्री आहे. राजकारणात प्रत्येकाची एक किंमत असते हे मोदींनी केव्हाच जाणले आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी मोदींविरोधात दीड-दोन वर्षांपूर्वी बंडाचा झेंडा उभारला त्यांना आता पंतप्रधानांनी पळता भुई थोडी केले आहे. आंध्र प्रदेशमधील सत्ता गेल्यावर बाबूना एकीकडे केंद्राचा आणि भाजपचा मारा झेलावा लागत आहे तर दुसरीकडे जगनमोहन रेड्डीनी त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. मोदींच्या कलाने घेतले नाही तर आपला ‘चंद्राबाबू’ बनू शकतो ही भीती प्रादेशिक नेत्यात आहे. गेल्याच आठवडय़ात वादग्रस्त शेती विधेयकाच्या निषेधार्थ मोदी सरकारमधून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाने ‘पंतप्रधान किसान विरोधी आहेत’ असे मानायला अजूनपर्यंत तरी नकार दिला आहे तो या भीतीमुळेच. अकाली दलातील सर्वेसर्वा असलेल्या प्रकाशसिंग बादल परिवाराला मोदींशी पंगा घेणे परवडणारे नाही. 30 वर्षातील पक्षाचा आलेख कसा चढता राहिला हे प्रभाविपणे दिसून येते. ‘मोदी हैं तो मुमकिन है’, हे भक्तमंडळी म्हणतात ती या यशामुळेच. मोदींनी भाजपला जगातला सर्वात मोठा पक्ष बनवला खरा, पण त्यातील विरोधाभास असा की पंतप्रधान सत्ताधारी पक्षापेक्षा मोठे दिसत आहेत. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना भाजप म्हणजे मोदी असे समीकरण झाले होते. आता ते पंतप्रधान झाल्यापासून भाजप म्हणजे मोदी असा संदेश साऱया देशभर गेलेला आहे. व्यक्तिस्तोमाच्या विरुद्ध असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींचा पर्सनॅलिटी कल्ट चालवून घेतला कारण 2014 ला त्यांना काहीही करून सत्तेत 10 वर्षे ठाण मांडून बसलेल्या काँग्रेसला नारळ द्यायचा
होता.काही महिन्यापूर्वीच अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन समारंभ झाला तेव्हा राम जन्मभूमी चळवळीचे नायक लालकृष्ण अडवाणी असले तर नरेंद्र मोदी हे महानायक आहेत हे चित्र अधोरेखित झाले. या साऱया समारंभात सरसंघचालक एखाद्या साईड ऍक्टरप्रमाणे बाजूला होते आणि सारा फोकस मोदींवर होता हे राजकारणातील अनभिज्ञाच्यादेखील लक्षात आले. तात्पर्य काय तर कोणाला आवडो अथवा नावडो, संघ आणि भाजपाहून मोदींचे नेतृत्व उत्तुंग झाले आहे हा संदेश सर्वदूर गेलेला आहे. कणखर नेतृत्वाच्या मुद्यावर बाजी मारून दोनदा सत्तेत आलेल्या मोदींपुढे सध्या आव्हानांचा डोंगर उभा आहे. एक आव्हान दुसऱयापेक्षा जटिल आहे. कोरोनाच्या महामारीने अगोदरच जर्जर झालेल्या अर्थव्यवस्थेला त्याने अजूनच तोळामासा केलेले आहे. बारा कोटी नोकऱया गेलेल्या आहेत आणि बेरोजगारांची फौज वाढत आहे तसा असंतोषदेखील वाढत आहे.

शेती विधेयकावरून पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर उताराला आहे. असे सगळे अंतर्गत प्रश्न आ वासून उभे असताना आक्रमक चीनने सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. कोणाचीही छाती या इतक्मया आव्हानांनी दबकून जायची. अशात मोदींनी 20,000 कोटींचा वादग्रस्त सेंट्रल विस्टा प्रकल्प विरोधकांच्या गंभीर आरोपांना न जुमानता नवी दिल्लीत सुरू केला आहे. या प्रकल्पअंतर्गत नवीन संसद भवन आणि पंतप्रधानांचे निवासस्थान आणि बरीच सरकारी कार्यालये निर्माण केली जाणार आहेत. सीमेवर शत्रू दबा धरून बसला असताना मोदींना या प्रकल्पाचे का बरे सुचले अशी कुजबुज राजकीय वर्तुळात वाढू लागली आहे. सध्याचे वर्ष 2020 मोदींची सत्त्वपरीक्षा बघत आहे. चीनने सुरू केलेली घुसखोरी म्हणजे मोदींच्या कणखर नेता प्रतिमेला तडा देण्यासाठीच आहे असे मानले जात आहे. मोदींचे नेतृत्व किती उत्तुंग अथवा कसे याचा कस पुढील वर्षभरात लागणार आहे.

सुनील गाताडे

Related Stories

देखणी जी अक्षरे

Patil_p

कोकणात शिवसेनेतील अस्वस्थता वाढतेय

Patil_p

दासबोधाच्या अभ्यासानेच व्यवस्थापनशास्त्र समजते

Patil_p

आली… निवडणूक घटिका समीप !

Omkar B

नव्या जगातील प्रेमकहाण्या

Patil_p

मोदी: एका दगडात तीन पक्षी

Patil_p
error: Content is protected !!