शहरात ठिकठिकाणी 300 रुपये भरुन घेऊन ग्राहकांची फसवणूक
कोल्हापूर / प्रवीण देसाई
फक्त 300 रुपयात ‘मोफत उज्वला गॅस’ कनेक्शनच्या नावाखाली जिह्यात ठिकठिकाणी ग्राहकांची लूट सुरु आहे. विशेषतः शहरात महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांकडून हा फंडा वापरुन फसवणूक होत असल्याचे चित्र आहे. परंतु अशी कोणतीही योजना जिल्हयात सुरु नसल्याचे प्रशासन व गॅस वितरकांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे फुकट मिळतय म्हणून 300 रुपये भरुन स्वतःची फसवणूक करुन घेऊ नये, असे आवाहनही गॅस वितरकांनी केले आहे.
केंद्र सरकारची मोफत उज्वला गॅस योजना सध्या प्रायोगिक तत्वावर उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार राज्यासह महाराष्ट्रातील विदर्भात या ठिकाणी सुरु आहे. अद्याप पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोल्हापूर जिह्यात ती सुरु नाही. त्यापध्दतीचे कोणतेही निर्देश सरकार किंवा प्रशासनाकडून गॅस वितरकांना आलेले नाहीत. त्यामुळे अशी कोणतीही योजना सध्या जिह्यात लागू नसल्याचे गॅस वितरकांनी स्पष्ट केले आहे. परंतु या योजनेच्या नावाखाली ग्राहकांकडून 300 रुपये उकळून काही जणांकडून त्यांची फसवणूक सुरु आहे. यामध्ये आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काही इच्छुकांनी हा फंडा वापरला आहे. यासाठी एक प्रकारचे ऑफिसच थाटले आहे. यामध्ये ग्राहकांची संपूर्ण माहिती भरुन घेण्यासाठी मुलांचीही नेमणूक केली आहे. त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे व अन्य माहिती संकलित केली जात आहे. एखाद्याचे बँक खाते नसेल तर 500 रुपये भरुन घेऊन ते ही तात्काळ काढून दिले जात आहे. आपापल्या प्रभागातील लोकापर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमाचा उपयोग केला जात आहे. कनेक्शन फुकट मिळतय म्हंटल्यावर नोंदणीसाठी अक्षरशः ग्राहकांच्या उडय़ा पडत आहे. 300 रुपये भरुन घेऊन ही नोंदणी केली जात आहे. हे पैसे नंतर सबसिडीद्वारे परत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात याची नोंदणी होत असल्याचे दिसत आहे. परंतु 300 रुपये भरताना ग्राहकांनी ही योजना पहिल्यांदा सुरु आहे का ? नाही याची खातरजमा करण्याची गरज आहे. मात्र, या प्रलोभनाला बळी पडून स्वतः ग्राहक आपली फसवणूक करुन घेत असल्याचे दिसत आहे.