Tarun Bharat

मोफत पाणी हा भाजपचा आणखी एक जुमला

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची खरमरीत टीका

प्रतिनिधी/ मडगाव

भाजप सरकार ‘हर घर जल’च्या बहाण्याने गोव्यातील जनतेची लूट करत आहे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलेले ‘मोफत पाणी’ हा एक फार्स आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे.  सरदेसाई यांनी शुक्रवारी मुरिडा-फातोर्डा येथील नाल्याचा गाळ उपसण्यासाठी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱयांसह भेट दिली आणि पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, लवकरच हे काम केले जाईल.

प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सरदेसाई म्हणाले की, 16 घन मीटर पाणी मोफत देण्याची योजना म्हणजे गोमंतकीय जनतेला लुबाडण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. नवीन पाणी दराचे गणित स्पष्टपणे दर्शवते की, मुख्यमंत्री पाणी दर 60 टक्क्मयांनी वाढवून लोकांची लूट करत आहेत, असे ते म्हणाले. अधिसूचनेनुसार 16 घन मीटर पाण्याचा नवीन दर प्रति युनिट 3.50 रु. केला आहे, जो आधी 2.50 रु. होता. 16 ते 25 घन मीटरसाठी 9 रु. (जुना दर 5 रु.), 25 ते 40 घन मीटरसाठी 15 रु. (जुना दर 10 रु.), 40 घन मीटरपेक्षा जास्त युनिटला 25 रु. (जुना दर 15 रु.) आणि 50 घन मीटरपेक्षा जास्त युनिटचा दर 25 रु. आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दिलासा देण्याऐवजी लूट

याचा अर्थ वाढीव पाणी दर 60 टक्के एवढा आहे. असे करून मुख्यमंत्री सामाजिक-राजकीयदृष्टय़ा जागरूक असलेल्या गोमंतकीयांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करत आहेत. सरकार पाणी फुकट देत नाही, तर लोकांची लूट करत आहे. महामारीच्या काळात सरकारने लोकांना दिलासा दिला पाहिजे, परंतु येथे सरकार जनतेची लूट करत आहे, असे ते पुढे म्हणाले.

म्हादईच्या विषयावर बोलताना सरदेसाई म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हादईला आपले प्राधान्य असल्याचे जाहीर केले आहे आणि ते त्यांच्या वकिलांना भेटून दिल्लीत तयारी करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री प्रमोद सावंत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहिले, जे कर्नाटकला अनुकूल आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

जमिनीवरील कॅसिनोसंदर्भात चित्र स्पष्ट करावे

सरदेसाई म्हणाले की, एंटरटेनमेंट पार्कसाठी 100 एकर जागा मंजूर करण्याच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. पण गुंतवणूक रोजगाराच्या संधींसाठी असावी. सरकारने जमिनीवरील कॅसिनो आणण्याचा निर्णय घेतला आहे की नाही हे स्पष्ट केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भाजप सरकारवर टीका करताना सरदेसाई म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे आणि कळंगूटमध्ये गावठी बंदुका सापडल्याने हे सिद्ध झाले आहे. वेगाने पैसा कमाविण्याची प्रक्रिया गोव्यात बंदूक संस्कृती आणत आहे. परंतु पोलीस हे गुन्हे रोखत नाहीत, त्याऐवजी सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते बनून फक्त बंदुका सापडल्या आणि कोणताही गुन्हा घडला नाही असे ते म्हणत आहेत. पोलीस सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते असू नयेत, असे ते म्हणाले.

Related Stories

बार्देश काबिज करणे हेच आमचे ध्येय

Amit Kulkarni

वृक्षतोड, जंगल जाळपोळीमुळे डोंगराना भूस्खलनाचा धोका

Amit Kulkarni

अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 पासून

Amit Kulkarni

पेट्रोलपंपवर बैलगाडी आणून काँग्रेसतर्फे इंधनवाढीचा निषेध

Amit Kulkarni

राज्यातील बेकायदेशीर कत्तलखाने रोखण्यात सरकार अपयशी

Omkar B

मृत वाघ तब्बल चार, विषप्रयोगाचा संशय

Patil_p