आंध्रप्रदेशला सध्या विजेच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. टंचाईचे प्रमाण इतके आहे, की सरकारी रुग्णालयांमध्येही कित्येकदा वीज नसते. नरसीपट्टणम येथील एनटीआर रुग्णालयात या वीजटंचाईमुळे एका महिलेचे बाळंतपण चक्क मोबाईलच्या प्रकाशात करण्याची वेळ आली.


गेल्या बुधवारी या महिलेला तिच्या पतीने प्रसववेदना सुरू झाल्यानंतर या रुग्णालयात आणले. यावेळी वीजपुरवठा बंद होता. बाळंतपण तातडीने करण्याची आवश्यकता होती. रुग्णालयात जनरेटरही उपलब्ध नव्हता. तसेच वेळ रात्रीची असल्याने नैसर्गिक प्रकाशही नव्हता. त्यामुळे डॉक्टरवर्ग मोठय़ाच पेचात सापडला होता. अखेर एका नर्सने यावर तोडगा काढला. तिने आपले सहकारी जमा केले आणि सर्वांना मोबाईलचा प्रकाश सुरू करण्यास सांगितले.
यामुळे बाळंतपणाची खोली (लेबररुम) काही प्रमाणात प्रकाशमान झाली. याच प्रकाशात बाळंतपण करण्यात आले. रुग्णालयात या वेळेला मेणबत्त्याही फारशी नव्हत्या आणि त्या आणण्यासाठी वेळही उपलब्ध नव्हता. त्यामुळे मोबाईलच्या प्रकाशातच महिलेचे बाळंतपण सुखरूप पार पडले. तथापि, आता या घटनेची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. रुग्णालयातील जनरेटर नादुरुस्त असल्याने तो सुरू नव्हता, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण दिले असले तरी चौकशीनंतरच जबाबदारीचे निर्धारण होणार आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच गाजत आहे. वारंवार वीज जात असल्याने सर्व रुग्णालयांमध्ये जनरेटर्सची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.