ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतीय हवामान खात्याने सुधारित मान्सुनचा अंदाज व्यक्त केला असून 2021 सालच्या या हंगामात 101 टक्के पावसाची सरासरी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच भारतात जून ते सप्टेंबर या काळात मान्सून सरासरीच्या सामान्य असणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने एका वर्च्युअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.


गेल्या एप्रिलमध्ये हवामान खात्याने मान्सुनचा पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये 98 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता या बाबत सुधारित अंदाज व्यक्त केला असून तो सरासरीच्या 101 टक्के असेल असे सांगण्यात आले आहे. प्रशांत महासागरात ला-लिना स्थिती तयार झाल्याने त्याचा फायदा नैऋत्य मान्सुनला होणार आहे. त्यामुळे मान्सुनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


यंदा मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92 ते 108 टक्के इतका होण्याची शक्यता आहे. तर उत्तर पूर्व भागात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर दख्खन पठारावर साधारण 91 ते 107 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.