Tarun Bharat

यजमान पाकची मालिकेत विजयी सलामी

वृत्तसंस्था/ लाहोर

शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान पाकिस्तानने बांगलादेशचा 5 गडय़ांनी पराभव करत या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली. पाकच्या शोएब मलिकला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

बांगलादेश संघाचा पाकच्या दौऱयातील हा पहिला पराभव आहे. शुक्रवारच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. बांगलादेशने 20 षटकात 5 बाद 141 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 19.3 षटकात 5 बाद 142 धावा जमवित विजय नोंदविला.

बांगलादेशच्या डावात मोहम्मद नईमने 41 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 43, तमिम इक्बालने 34 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 39, लिटॉन दासने 13 चेंडूत 2 चौकारांसह 12, कर्णधार मेहमुदुल्लाने 14 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 19, हुसेनने 9 तर सौम्या सरकारने 1 चौकारासह 7 आणि मोहम्मद मिथुनने 1 चौकारासह नाबाद 5 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे शाहीन शहा आफ्रिदी, हॅरिस रॉफ आणि शादाब खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. संघाचे खाते उघडण्यापूर्वीच पहिल्याच षटकातील दुसऱया चेंडूवर कर्णधार बाबर आझम एस. इस्लामच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर एहसान अली आणि मोहम्मद हाफीज यांनी 35 धावांची भागीदारी केली. हाफीजने 3 चौकारांसह 165 चेंडूत 17 धावा जमविल्या. एहसान अलीने 32 चेंडूत 4 चौकारांसह 36 धावा जमविल्या. इफ्तिकार अहमदने 13 चेंडूत 2 चौकारांसह 16, इमाद वासीमने 1 चौकारासह 6 तर रिझवानने नाबाद 5 धावा केल्या. अनुभवी फलंदाज शोएब मलिकने 45 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 58 धावा जमवित आपल्या संघाला 3 चेंडू बाकी ठेवून 5 गडय़ांनी विजय मिळवून दिला. बांगलादेशतर्फे एस. इस्लामने 27 धावात 2 तर एम. रेहमान, हुसेन आणि ए. इस्लाम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक- बांगलादेश 20 षटकात 5 बाद 141 (मोहम्मद नईम 43, तमिम इक्बाल 39, मेहमुदुल्ला नाबाद 19, दास 12, आफ्रिदी, रॉफ आणि शदाब खान प्रत्येकी 1 बळी). पाक- 19.3 षटकात 5 बाद 142 (शोएब मलिक नाबाद 58, एहसान अली 36, मोहम्मद हाफीज 17, इफ्तिकार अहमद 16, एस. इस्लाम 2-27, एम. रेहमान, हुसेन, ए. इस्लाम प्रत्येकी 1 बळी).

Related Stories

भारतीय महिला क्रिकेट संघाची विजयी सलामी

Patil_p

निवड समितीसाठी शिवरामकृष्णन, चौहान, अमेय खुरासियांचे अर्ज

Patil_p

सायकलवरुन प्रवास करणाऱया ज्योतीचे इव्हान्काकडून कौतुक

Patil_p

मोहमद शमीच्या जागी उमेश यादव

Patil_p

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत चारीमुंडय़ा चीत!

Patil_p

स्टीव्हन गेरार्ड कोरोनाबाधित

Patil_p