Tarun Bharat

यमकनमर्डीत अज्ञाताकडून गोळीबार

एक जण जखमी : मालमत्तेच्या वादातून हल्ल्याचा संशय

वार्ताहर/ यमकनमर्डी

येथील उपतहसीलदार कार्यालयाजवळ असणाऱया कुबेर रेडिमेड क्लॉथ सेंटरसमोर अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना बुधवारी रात्री 11.35 च्या सुमारास घडली. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. भरमा भुपाल दुपदाळी (वय 55) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. यापूर्वी मालमत्तेच्या वादावरून भरमा दुपदाळी यांना जिवे मारण्याची सुपारी दिल्याचे उघडकीस आले होते. आता पुन्हा भरमा दुपदाळी यांच्यावर गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  गोळीबार केलेल्या अज्ञाताचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने भरमा दुपदाळी, किरण बाळाराम रजपूत, अलताफ छडेदार आणि आनंद ईश्वर पिटगी हे चौघे जण निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर बुधवारी रात्री कुबेर रेडिमेड क्लॉथ सेंटरसमोर चर्चा करत बसले होते. त्यावेळी समोरून आलेल्या अज्ञाताने अचानक त्यांच्यावर गोळीबार करून पलायन केले. या घटनेनंतर तात्काळ किरण रजपूत यांनी याची माहिती यमकनमर्डी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जखमी भरमा दुपदाळी यांना रुग्णालयात दाखल केले.

माझे राजकारणात कोणीही विरोधक नाहीत

गत तीन-चार महिन्यांपूर्वी मालमत्तेच्या वादावरून भरमा दुपदाळी यांना जिवे मारण्याची सुपारी महावीर धनपाल दुपदाळी (निवृत्त वकील) यांना दिल्याचे समजते. मात्र, महावीर दुपदाळी यांचा कोरोनाने रुग्णालयातच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आमचे बंधू शांतीनाथ दुपदाळी यांना वगळता माझे राजकारणात कोणीही विरोधक नाही, असे भरमा दुपदाळी यांनी सांगितले आहे. त्यामुळे या घटनेला वेगळेच वळण लागले असून गोळीबार केलेल्या अज्ञाताचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे. यानंतरच या घटनेची सविस्तर माहिती उघडकीस येणार आहे.

तोंड बांधल्याने ओळख पटणे कठीण

यमकनमर्डी मतदारसंघातील बहुतेक खेडय़ांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, यमकनमर्डीत मोजक्याच ठिकाणी कॅमेरे सुरू आहेत. त्यामुळे सदर गोळीबार केलेली व्यक्ती कॅमेरामध्ये कैद झाली नाही. मात्र, काही कॅमेऱयांमध्ये अज्ञात व्यक्ती पळून गेल्याचे कैद झाल्याचे समजते. मात्र, सदर व्यक्तीने आपले तोंड झाकल्याने त्याची ओळख पटणे कठीण जाणार आहे.

गावठी पिस्तूल वापरल्याचा संशय

यापूर्वी कित्तूर येथे ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या सांगण्यानुसार, भरमा दुपदाळ यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, एका वकिलाची चौकशी करण्यात आली होती. मात्र, त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सदर गोळीबार सुमारे 6 ते 8 फुटांवरून करण्यात आल्याने मोठय़ा प्रमाणात धूर आणि आवाज आला होता. दरम्यान, घटनास्थळी असलेल्यांमध्ये भीती निर्माण झाली असून गोळीबारासाठी वापरलेली पिस्तूल गावठी असल्याचे समजते, असे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.

 घटनास्थळी जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, गोकाकचे डीवायएसपी जावेद इनामदार, हुक्केरीचे सीपीआय कल्याणशेट्टी, पीएसआय रमेश पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. हा हल्ला मालमत्तेच्या वादावरून झाल्याची चर्चा होत असल्याने चौकशीनंतरच याबाबतच्या सविस्तर माहितीचा उलगडा होणार आहे.

Related Stories

यंदा उसाची होणार पळवापळवी

Patil_p

त्या’ नराधमांना फाशी द्या, सरकारने राजीनामा द्यावा

Patil_p

विद्यार्थ्यांना करावी लागतेय चिखलातून पायपीट

Amit Kulkarni

राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवणारी दौड

Patil_p

महापौर, उपमहापौर निवडीसाठी तयारी सुरू

Amit Kulkarni

हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेसचा मडगावपर्यंत विस्तार

Amit Kulkarni