वार्ताहर / देवराष्ट्रे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे येथील स्मारकासाठीची बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना संपली. यावेळी स्मारकासाठी आवश्यक असणाऱ्या जागामालकांनी सांमजस्याची भुमिका घेऊन सहकार्य करावे. त्यांना मोबदला म्हणून शासन पाच पट रक्कम व जागा देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. जागामालकांनी स्मारकासाठी जागा देण्यास विरोध दर्शवला आहे.
जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, यशवंतरावांच्या जन्मस्थळी स्मारक होण्यासाठी शेजारील जागेची आवश्यकता आहे. संबंधित जागामालकांनी जागा दिल्यास जागामालकांना पाचपट नुकसानभरपाई मिळणार आहे. तसेच गावातच अन्य ठिकाणी त्याचे पुर्नवसन होणार आहे. स्मारकासाठी 2.26 कोटी रु. एवढा निधी उपलब्ध असून जबरदस्तीने कोणाचीही जमिन घेतली जाणार नाही. यावेळी डॉ.चौधरी यांनी जागामालकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघराची पाहणी करुन शेजारील आवश्यक जागेचीही पाहणी देखील केली.
मात्र स्मारकासाठी जागा मालकांनी जागा देण्यासाठी तीव्र विरोध दर्शवला आहे. यावेळी सहाय्यक संचालक विलास रहाणे, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार शैलजा पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मिरजकर, गटविकास अधिकारी दाजी दाईगडे, ग्रामसेवक उत्तम पाटील यांच्यासह जागामालक, ग्रामस्थ उपस्थित होते.


previous post
next post